मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील भटवाडी परिसरातील जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झाली असून, पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांनी सोमवार, १७ मार्चपासून पुढील १० दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, अशी सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.
भटवाडी परिसरातील आर. बी. कदम मार्गानजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सोमवारपासून कप्पा क्रमांक २ मधून पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरातील रहिवाशांनी १७ ते २७ मार्चपर्यंत पाणी उकळून व गाळून प्यावे, अशी सूचना पालिकेने केली आहे.
घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक २ची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आता कप्पा क्रमांक १ च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे पालिकेने सांगितले.
डागडुजीसाठी साडेनऊ कोटी रुपयांचा खर्च
घाटकोपर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४९ वर्षे जुन्या जलाशयाच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी दीड वर्ष लागले. हा जलाशय १९७३ मध्ये बांधला असून, तो दोन कक्षांत विभागला आहे.
जलाशयाची पाणी साठवण क्षमता ११.३५ दशलक्ष लिटर आहे. पालिकेने या जलाशयाची संरचनात्मक तपासणी केली असता त्याच्या अहवालात व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची गरज असल्याचे म्हटले होते.
पाणीपुरवठा विभागाने त्याचे काम हाती घेतले. आता त्यापैकी एका कप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. जलाशयाचे लिकेज, भिंतीचे काँक्रीट, आतील स्तंभ व पायऱ्यांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. या कामासाठी पालिकेने नऊ कोटी ५३ लाख रुपये खर्च केले आहेत.
या विभागातील रहिवाशांना सूचना
नारायणनगर - चिरागनगर, आझादनगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल वसाहत, एनएसएस मार्ग, महिंद्रा उद्यान, डी. एस. मार्ग, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नौरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गिगावाडी.
पंतनगर आउटलेट- भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राइम ब्रँच परिसर, वैतागवाडी, नित्यानंदनगर, ध्रुवराजसिंग गल्ली मार्ग, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, अंधेरी-घाटकोपर जोडमार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम) लगतचा परिसर, श्रेयस सिग्नल आदी.
सर्वोदय बुस्टिंग- सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा परिसर, घाटकोपर पश्चिम, गांधी नगर.