मुंबई : मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने पालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडत काही रुग्णालयांसह नर्सिंग होम्स नॉनकोविड केले. मात्र दुसरीकडे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत १० हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे पालिका प्रशासनाने रुग्णालयांसह नर्सिंग होम्स नॉनकोविड करण्याचा निर्णय घाईत घेतल्याचे चित्र आहे. परिणामी, शहर उपनगरांत खाटांचा अभाव दिसत असून दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख चढताच आहे.मुंबईत, आतापर्यंत खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयातील तसेच जम्बो सुविधा केंद्रात मिळून १ हजार ४१३ आयसीयू खाटा आहेत. त्यातील फक्त १२५ खाटा रिक्त आहेत. ज्या नर्सिंग होममध्ये ५० पेक्षा कमी बेड्स आहेत त्यांनी कोविड रुग्णांवर उपचार न करता इतर नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत असा निर्णय गेल्या महिन्यात पालिकेकडून घेण्यात आला होता. मात्र आता हा निर्णय पालिकेला न परवडणारा असून, त्यामुळे आता आयसीयू खाटांची कमतरता जाणवू लागली आहे.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, मागील काही महिन्यांपर्यंत दररोज ७५०० हजार चाचण्या करण्यात येत होत्या. हे प्रमाण आता १२ हजारपर्यंत वाढविण्यात आल्यामुळेच कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात घाबरण्याचे कोणतेही कारण नसून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत पुढच्या टप्प्यात दररोज सरासरी १४ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य असल्याचेही नमूद केले.याखेरीज, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी माहिती देताना सांगितले, शहर उपनगरात रुग्ण वाढत असले तरी पॅनिक व्हायची गरज नाहीय. सामान्यांनी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजित अंतर राखणे हे नियम कटाक्षाने पाळावेत. दुसऱ्या बाजूला खाटांच्या उपलब्धता सध्या नियंत्रणात असून त्यात वाढ करण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाच्या स्तरावर योग्य निर्णय घेण्यात येईल.आयसीयू बेड्सही पडताहेत कमीगणेशोत्सव, ईद या सणांचा काळ आणि अनलॉक केल्यामुळे रुग्णांची संख्या मुंबईत मोठ्या संख्येने पुन्हा वाढली. त्यामुळेही आयसीयू बेड्स कमी पडत आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांतही डॉक्टरांनी आयसीयूच्या खाटा नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.
रुग्णालयांसह नर्सिंग होम नॉनकोविड केल्याचा फटका; रुग्णांचा आलेख चढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 06:53 IST