अंध सुजाता करणार नेत्रदान

By Admin | Updated: November 28, 2015 01:13 IST2015-11-28T01:13:46+5:302015-11-28T01:13:46+5:30

अंध युवती कशी नेत्रदान करणार, हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडणार. मात्र, हे वास्तव आहे. अंबरनाथची सुजाता कोंडीकिरे ही युवती अंध असली तरी तिने नेत्रदान करण्याचा संकल्प अवयवदान

Blind Sujata will be eyeing the eyeball | अंध सुजाता करणार नेत्रदान

अंध सुजाता करणार नेत्रदान

पंकज पाटील,  अंबरनाथ
अंध युवती कशी नेत्रदान करणार, हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडणार. मात्र, हे वास्तव आहे. अंबरनाथची सुजाता कोंडीकिरे ही युवती अंध असली तरी तिने नेत्रदान करण्याचा संकल्प अवयवदान दिनाचे निमित्त साधून केला आहे. डोळ्यांचा उपयोग तिला होत नसला तरी तिच्या डोळ्यांतून हे जग पाहण्याची किमया इतर अंध व्यक्ती नक्कीच साधू शकतील, हे कळल्यावर तिने हा संकल्प केला आहे. लख्ख उजेडात वाढलेल्या सुजातासमोर एकदम काळाकुट्ट अंधार आलेला असला तरी ती अजूनही खंबीरपणे आपल्या अंधत्वावर मात करतांना दिसत आहे.
ती जन्मत:च अंध नाही, तर तिला अंधत्व आले ते वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी. अंबरनाथ, घाडगेनगर भागात ती आई, ३ बहिणी आणि एक भाऊ यांच्याबरोबर राहते. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. ती रांगोळी, पेंटिंग, गाणी यात पारंगत आहे. दहावीचे शिक्षण झाल्यावर ती सांगली येथे ११ वीच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेली. तिथे होस्टेलमध्ये असताना खेळताना एकदा झाडावर डोके आपटल्याने तिची दृष्टी अधू झाली. त्यावेळी तत्काळ तिच्यावर उपचार केल्याने तिला पुन्हा दिसू लागले. दृष्टी पुन्हा मिळाल्यावर तिने उल्हासनगर येथील आरकेटी महाविद्यालयात पदवी प्राप्त करून खाजगी कंपनीत नोकरी केली. कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सुजाताला अकस्मात पुन्हा अंधत्व आले.
वयाच्या २६ व्या वर्षी तिची दृष्टी हळूहळू कमकुवत होत गेली. वर्षभरातच तिला पूर्ण अंधत्व आले. अशा काळ्याकुट्ट अंधारात तिची दोन वर्षे निघून गेली. वैद्यकीय उपचार सुरू झाले तेव्हा कळले की, मेंदूमधून डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये दोष असल्याने तिची दृष्टी गेली. आपल्या अंधत्वावर जास्त विचार करत न बसता तिने जिद्दीने अंधांचे शिक्षण (ब्रेल लिपीचे) घेण्याचा निर्णय घेतला. बदलापूर येथील अंध शाळा आणि नॅबमधून ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. अंधांसाठी खास विकसित केलेल्या जॉर्ज सॉफ्टवेअरचा अभ्यास केला. साडेतीन वर्षांत तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तब्बल २६ परीक्षा दिल्या. जॉर्ज सॉफ्टवेअरचा अभ्यास करून तिने संगणकाचे प्रशिक्षणही घेतले. व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण घेतले.
तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांना नियतीनेही चांगली साथ दिली. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सुजाताला स्टेट बँक आॅफ म्हैसूरच्या डोंबिवली शाखेत स्केल वन प्रोबेशनरी आॅफिसर म्हणून नोकरी मिळाली. लवकरच आपण प्रथम श्रेणी अधिकारी बनू, असा ठाम विश्वास तिला आहे.

Web Title: Blind Sujata will be eyeing the eyeball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.