बेळगावात दगडफेक, तोडफोड
By Admin | Updated: September 25, 2014 23:26 IST2014-09-25T23:08:35+5:302014-09-25T23:26:40+5:30
तलवार हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू; जमावबंदीचा आदेश

बेळगावात दगडफेक, तोडफोड
बेळगाव : गांजा विक्रीच्या प्रकरणातून तलवार हल्ला झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर समाजकंटकांनी बेळगाव शहरात दगडफेक करून दुकाने, वाहने यांची मोडतोड करून शहरात धुडगूस घातला. अनेक दुकानांवर दगडफेक करून मोडतोड केली. दगडफेकीत १० वाहने व १५ पेक्षा जास्त दुकानांची मोडतोड झाली आहे. या घटनेमुळे बेळगावच्या जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. धर्मर्वीर संभाजी चौकात व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र जमून समाजकंटकांच्या गुंडगिरीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
दगडफेकीमुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी दुकाने लगेच बंद केली. दंगा झाल्याचे वृत्त समजताच प्रत्येकजण घरी निघाल्यामुळे बेळगावात अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी निर्माण झाली. त्यामुळे जनतेत आणखी गोंधळ माजला.
काल, बुधवारी रात्री अनगोळ येथे दारू पित बसलेले असताना वादावादी होऊन फिरोज पठाण (वय २५) याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. हा हल्ला गांजा विक्रीच्या प्रकरणातून झाल्याचे समजते. हल्ला करून हल्लेखोरांनी तेथून पळ
काढला.
फिरोज रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी ग्लासवरील बोटांचे ठसे घेतले असून, त्याच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. हल्ल्यानंतर लगेच अंगोल परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला. जिल्हा सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या.
जखमी फिरोजला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले; पण तेथील डॉक्टरांनी त्याला केएलई रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. आज, गुरुवारी दुपारी फिरोजचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव केएलई रुग्णालयात जमला. पोलीस आयुक्त भास्कर राव आणि उपायुक्त अनुपम अगरवाल तेथे दाखल झाले. यावेळी केएलई रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांनी तेथून जमावाला पांगविल्यानंतर मोटारसायकलवरून शंभरहून अधिक युवक दगडफेक करीत निघाले. सिव्हिल हॉस्पिटल मार्ग, कॉलेज रोड, खानापूर रोड, गोवावेस, आरपीडी कॉर्नर येथे दगफेक करून लोकांमध्ये दहशत माजवली. यावेळी पोलीस नसल्यामुळे समाजकंटकांनी दगडफेक करून शहरालाच वेठीला धरले. बेळगाव शहरातील संभाजी चौकातील कॉलेज रोडवरील पाच, गोवावेसमधील पाच दुकाने आणि इमारतींवर आणि आठ वाहनांवर दगडफेक करून नासधूस करण्यात आली. (प्रतिनिधी)