Join us  

‘अर्सेनिक अल्बम’ च्या कच्च्या मालाचाही काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 6:08 PM

प्लास्टिकच्या बाटल्या, साखरेच्या गोळ्या आणि औषधाची किंमत दुप्पट

 

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वत्र अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधांच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याने त्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या औषधासाठी लागण्या-या प्लास्टिकच्या बाटल्या (व्हाँयल), साबुदाण्यासाररख्या दिसणा-या साखरेच्या गोळ्या (ग्लोब्युल्स) आणि प्रत्यक्ष औषध यांच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. अनेक होमिओपॅथी डाँक्टरांना हा कच्चा माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.  

अर्सेनिक अल्बम हे द्रवरुपातील औषध भारतासह जर्मन कंपन्याही तयार करतात. जर्मन कंपन्यांचा दर ३० मिली लिटर्ससाठी २७५ ते २९५ रुपये आहे. तर भारतीय कंपन्या १७५ ते १९५ रुपये आकारतात. सध्या जर्मनीहून होणारा पुरवठा बंद असून भारतीय कंपन्यांतील निर्मितीसुध्दा लाँकडाऊनमुळे रोडावली होती. मागणी झपाट्याने वाढल्याने या औषधाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याची माहिती डाँ. अरविंद पांडे यांनी दिली. ज्यांच्याकडे या औषधाचा साठा आहे ते ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारून औषधांची विक्री करत आहेत. त्यामुळे माझ्यासर अनेक डाँक्टरांना हे औषधच उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, थेट द्रवरूपाना औषध घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळेही या तुटवड्यात वाढ होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

औषधासाठी अर्धा एक, आणि दोन ड्रम साईझच्या व्हाँयल लागतात. दोन ड्रम साईझच्या बाटल्यांमध्ये कुटुंबातील ६  जणांना पुरतील एवढ्या औषधाच्या गोळ्या देता येतात. काही महिन्यांपूर्वी ८० पैसे ते एक रुपयाला एक या दरात त्या मिळायच्या. मात्र, लाँकडाऊनमुळे अनेक प्लास्टिक उत्पादनांचे कारखाने बंद असल्याने त्यांचाही तुटवडा आहे. सध्या जिथे निर्मितीला परवानगी  आहे तिथे दीड ते दोन रुपये दराने विक्री होत आहे. औषध तयार करण्यासाठी ज्या साबुदाण्यासारख्या दिसणा-या साखरेच्या छोट्या गोळ्या वापरल्या जातात ते त्यांच्या आकारानुसार प्रति किलो १७५ ते २०० रुपयांना मिळायच्या. त्यांची किंमत आता ४०० रुपयांवर झेपावल्याची माहिती डाँक्टरांकडून हाती आली आहे.  

 

व्हाँयलची पळवापळवी ?

ठाण्यात सामाजिक कार्य करणा-या एका संस्थेने वसई येथील प्लास्टिक कारख्यान्यात १० हजार बाटल्यांची आँर्डर दिली होती. मात्र, संस्थेचे कार्यकर्ते तिथे पोहचण्यापुर्वीच एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या बाटल्या खरेदी केल्या. त्यामुळे आम्हाला चार हजार बाटल्याच उपलब्ध झाल्याचे या कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

----------------------------------

परिस्थिती लवकरच सुधारेल

अर्सेनिक अल्बम औषध आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कच्चा माल यांचा तुटवडा असला तरी उत्पादन प्रक्रियेला सध्या जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही तूट भरून निघेल अशी आशा ठाण्यातील एका प्रतिथयश डाँक्टरांनी दिली. तुटवडा निर्माण झाला की भाववाढ होते. हा मानवी स्वभावच असल्याचे मतही त्यांनी नाव न छापण्याच्या अटिवर व्यक्त केले. 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस