Join us

गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड; कांदिवली लालजीपाडा येथे तिघांवर गुन्हा; ४१.३९ लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 13:58 IST

बजेश मौर्या, राकेश यादव आणि दीपक सरोज अशी आरोपींची नावे आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथे ४१.३९ लाखांच्या सिलिंडरचा काळा बाजार उघड झाला असून शिधावाटप विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,७,८ तसेच तरल पेट्रोलियम गॅस (आपूर्ति आणि वितरण विनियमन) आदेश कलम २,३,४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बजेश मौर्या, राकेश यादव आणि दीपक सरोज अशी आरोपींची नावे आहेत. शिधावाटप अधिकारी ज्योती पटेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ ऑक्टोबर रोजी प्रभारी सहायक नियंत्रक शिधावाटप अधिकारी विनायक निकम, निरीक्षक राजीव भेले, सुधीर गव्हाणे, अमित पाटील, संदीप दुबे यांच्यासह शिधावाटप कार्यालय क्रमांक २८ (ग) येथील नियंत्रक सर्वश्री परुळेकर, लक्ष्मण अक्कावार आणि अन्य अधिकाऱ्यांनी लालजीपाडा येथील दीपक पार्किंगमध्ये धाड टाकली.

यावेळी राकेशने गेल्या अडीच वर्षांपासून अपना भारत गॅस एजन्सीचा मालक आझाद खान याच्याकडून १९ किलो, तसेच ५ किलो वजनाचे घरगुती सिलिंडर घेऊन त्याची प्रति सिलिंडर ९० रुपयांच्या मोबदल्याने विक्री करत असल्याचे कबूल केले. विक्री केलेल्या या सिलिंडरच्या इन्व्हाईसची प्रत ग्राहकांना दिली जात नव्हती. पथकाने केलेल्या चौकशीत अन्य दोन आरोपींनीही अशीच सिलिंडर विक्री केल्याची कबुली दिली.

३३ वाहने ताब्यात

- यावेळी गॅस सिलिंडरचा वाहनांमध्येच साठा केला असल्याने या कारवाईत ७६९ सिलिंडरसह एकूण ३३ वाहने ताब्यात घेण्यात आले.- या सिलिंडरची किंमत ४१ लाख ३९ हजार ६९९ रुपये आहे. मात्र हे सिलिंडर रिफिल कोण करत होते- यामध्ये संबंधित गॅस कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची काही भूमिका आहे, का याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :मुंबईगॅस सिलेंडरधोकेबाजी