मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यास बनविलेल्या वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) ते चुनाभट्टी उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याबाबतची घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या उड्डाणपुलामुळे धारावी आणि सायन जंक्शन दरम्यान होणाऱ्या वाहतूककोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाहनधारकांचा तब्बल तीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे.चौपदरी असलेल्या बीकेसी ते चुनाभट्टी उड्डाणपुलामुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. हा उन्नत मार्ग बीकेसी, बाबुभाई कंपाउंड, सायन सेंट्रल रेल्वे, डंकन कॉलनी, हार्बर लाइन (चुनाभट्टी स्टेशन), सोमय्या मैदान असा असून, मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हे आणखी एक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विशेष म्हणजे, हा पूल तयार असूनसुद्धा केवळ उद्घाटनाला वेळ मिळत नसल्याने बंद ठेवल्याचा आरोप करत, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी ऐन दिवाळीत आंदोलन केले होते.हा उड्डाणपूल एमएमआरडीएमार्फत शनिवारी सुरू होणार होता. मात्र, या पुलाची काही कामे शिल्लक असल्याने, ही कामे पूर्ण झाल्यावरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देशही मलिक यांनी शनिवारी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले होते. पाऊस असल्याने आम्ही शिल्लक असलेली कामे करू शकलो नव्हतो. मात्र, कामे सुरू करून लवकरच पूर्ण करून सुरू करू, असे एमएमआरडीएकडून शनिवारी सांगण्यात आले होते. त्यानुसार, कामे पूर्ण होताच रविवारपासून या उड्डाणपुलावर वाहतूक सुरू करण्यात आली.>बीकेसी चुनाभट्टी अंतर ३० मिनिटांनी कमी होणारएमएमआरडीएने २०३ कोटी रुपये खर्चून तयार केलेला १.६ किमी लांबीच्या या उड्डाणपुलावरून अवघ्या काही मिनिटांमध्ये बीकेसीतून चुनाभट्टीमध्ये पोहोचणे शक्य झाले आहे. त्यामुळे या आधी या प्रवासाला लागणाºया वेळेत तब्बल ३० मिनिटांची बचत होणार आहे. चुनाभट्टी येथील सोमैया मैदानापासून सुरू होणारा हा पूल चुनाभट्टी आणि सायन, एलबीएस रोड आणि मिठी नदी येथून बीकेसी डायमंड मार्केटच्या मागे उतरतो.
बीकेसी-चुनाभट्टी उड्डाणपुलामुळे प्रवाशांची तीस मिनिटे वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:58 IST