Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपा शब्दाची पक्की, बिहारमध्ये नितीश कुमार हेच राज्याचे मुख्यमंत्री'

By महेश गलांडे | Updated: November 11, 2020 15:39 IST

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होतील, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपा ही शब्दाला पक्की आहे,

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होतील, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपा ही शब्दाला पक्की आहे,

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचं श्रेय विरोधी पक्षनेते आणि बिहार निवडणुकांचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना दिलं आहे. लॉकडाऊन काळात जेव्हा लोक त्रासले होते, तेव्हा अनेक मंत्री, मुख्यमंत्री केंद्र सरकारवर टीका करत होते, त्या टीकेची पर्वा न करता नरेंद्र मोदी काम करत होते, लोकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यामुळे या टीकाकारांनी आत्मचिंतन करावं, नरेंद्र मोदी कसं काम करतायेत हे पाहावं असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होतील, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपा ही शब्दाला पक्की आहे, त्यामुळे निवडणुकांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे नितीशकुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील निवडणुकांवेळी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असे अनेक संभांमध्ये जाहीरपणे सांगण्यात आले होते. मोदींनी उद्धव ठाकरेंच्या समोर भाषणात सांगितले होते की, मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल. तर बिहारमध्ये मोदींनीच जेदयुचा मुख्यमंत्री होईल, असे स्पष्टपणे सांगितल्याची आठवणही फडणवीस यांनी करुन दिली. 

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा अनुभव नक्कीच बिहार विधानसभा निवडणुकांसाठी मला कामी आला. राजकारणात शिकत-शिकतच प्रगल्भता आपल्याकडे येत असते, असेही फडणवीस यांनी म्हटले. या निकालामुळे राज्यातला भाजपाचा मतदार आणि कार्यकर्ता यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत, त्याची जबाबदारी सांभाळत आहोत, शेतकरी, मराठा आरक्षण यासारखे अनेक प्रश्न आहेत, काही जण ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी सामोरे जाऊ असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होईल का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

फडणवीसांकडून शिवसेनेचा समाचार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे डिपॉझिट वाचलं नाही, नोटापेक्षाही कमी मतदान झालं, त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, भाजपा हा मोठा पक्ष आहे, केवळ बिहारमध्येच नाही तर इतर राज्यातील पोटनिवडणुकीतही लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला. लॉकडाऊन काळात जेव्हा लोक त्रासले होते, तेव्हा अनेक मंत्री, मुख्यमंत्री केंद्र सरकारवर टीका करत होते, त्या टीकेची पर्वा न करता नरेंद्र मोदी काम करत होते, लोकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यामुळे या टीकाकारांनी आत्मचिंतन करावं, नरेंद्र मोदी कसं काम करतायेत हे पाहावं असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

शरद पवार मोठे नेते

शरद पवार हे मोठे नेते आहेत, मी लहान नेता आहे. पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी मिळाली, काही काळ कोरोनामुळे लढाईत नव्हतो, पण मी आनंदी आहे, त्यामुळे कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसला सध्या कोणीही विचारायला तयार नाही, वेगवेगळ्या राज्यात ज्यांच्यासोबत काँग्रेसशी युती आहे त्यांच्यामुळे काँग्रेसला मतदार उरला नाही, राजकारणात जर, तर या शब्दाला अर्थ नसतो, बिहार निकालाचं पूर्ण श्रेय नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना दिलं पाहिजे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यात फरक असतो, त्यामुळे मोठा आव आणला तरी तेथील स्थानिक जनता त्याचं उत्तर देते असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

बिहारमध्ये महिलांनी भाजपाला जास्त मतदान केलं  

नरेंद्र मोदींवरच्या विश्वासाची लाट आहे, बिहारमध्ये १५ वर्ष सरकार होतं, त्यामुळे काही प्रमाणात अँन्टी इन्कम्बन्सी लाट असते, परंतु मोदींबद्दल लोकांना विश्वास आहे. पुरानंतर बिहारी लोकांना मदत केली, आपत्ती काळात लोकांच्या पाठिशी केंद्र सरकार ठाम उभे राहिले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. काँग्रेस आरजेडीच्या सभेत आलेल्या महिलांनीही नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला, ६ टक्के महिलांचे मतदान वाढलं. हा फरक निकालात दिसून आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेचा भाजपावर निशाणा

बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो. तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱयांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले. नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागलं.  नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या ७२ तासांत स्पष्ट होईल असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईबिहार विधानसभा निवडणूकशिवसेनानितीश कुमार