रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास आठ वर्षांपूर्वी भाजपचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:06 IST2021-07-17T04:06:56+5:302021-07-17T04:06:56+5:30
शिवसेनेचा पलटवार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद ...

रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्यास आठ वर्षांपूर्वी भाजपचा पाठिंबा
शिवसेनेचा पलटवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडी येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने विरोध दर्शवित महापौरांकडे दाद मागितली आहे. प्रत्यक्षात २०१३ मध्ये सत्तेत असताना भाजपने गोवंडीतील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा दिला होता, असा दावा करीत शिवसेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे. राजकारण करण्यासाठीच नामकरणावरून आगपाखड सुरू असल्याचा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.
गोवंडी, कचराभूमी येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत बाजार उद्यान समितीच्या सभेचा भाजप सदस्यांनी त्याग केला होता; मात्र संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवत असल्याची भूमिका बाजार उद्यान समितीच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांनी घेतली होती. यामुळे संतप्त भाजप सदस्यांनी अध्यक्षांना घेराव घालून घोषणाबाजी केली, तसेच महापौर दलनातही आंदोलन केले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरच डाव उलटविला. गोवंडी, बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या मार्गाला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला भाजप सदस्याने अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचे महापौरांनी सांगितले. २०१३ मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या, भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच त्यांनी दाखविली.
शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग भाजप देत आहे. भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आले आहे.
- किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर.