भाजपासमोर पेच, सेना की बविआ
By Admin | Updated: January 31, 2015 22:27 IST2015-01-31T22:27:30+5:302015-01-31T22:27:30+5:30
पालघर जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही.

भाजपासमोर पेच, सेना की बविआ
दीपक मोहिते ल्ल वसई
पालघर जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. वसई वगळता अन्य तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करीष्मा अद्याप टिकनू असल्याचे भाजपला मिळालेल्या यशावरून स्पष्ट झाले आहे. डहाणू, जव्हार, तलासरी व विक्रमगड तालुक्यात भाजपची पाळेमुळे रुजली आहेत. पालघर तालुक्यात मात्र भाजपाला चमकदार कामगिरी करणे शक्य झाले नाही. येथे सेनेपाठोपाठ बविआने चांगलीच मुसंडी घेत दुसरा क्रमांक पटकावला. भाजपाच्या पारड्यात केवळ ३ जागा पडल्या तर बविआने ५ जागांवर वर्चस्व राखले.
राज्यात सत्ता स्थापन करताना बविआने फडणवीस सरकारला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्या पार्श्वभुमीवर बविआ व भाजपा एकत्र येण्याची शक्यता आहे. वरीष्ठ स्तरावर बविआच्या नेत्यांचा भाजपामधील वरीष्ठ नेत्यांशी घनिष्ट संंबंध असले तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांमधून विस्तव जात नाही. वसईत भाजपाच्या नेत्यांचे मा. आमदार विवेक पंडीत यांच्या वसई जनआंदोलन समितीशी साटेलोटे आहे, त्यामुळे बविआ व भाजपाची एकत्रित सत्ता येण्याची शक्यता धुसर आहे. सेनेशी पटत नाही तर बविआचा संग नको अशा कात्रीत भाजपा सापडला आहे, यातुन पक्षाचे वरीष्ठ नेते कसे मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या या सर्व धुमशानमध्ये काँग्रेस पक्षाची मात्र अक्षरश: वाताहत झाली; पक्षाच्या बहुतेक उमेदवारांवर अनामत रक्कमा जप्त होण्याची नामुष्की आली. गेली २० वर्षे पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या तालुक्यात पक्ष वाढवण्याचे प्रयत्नच झाले नाहीत. केवळ निवडणुकीपुरते सक्रीय होणे एवढेच माहित असलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष नामशेष होत गेला.
राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकत आपले अस्तित्व काही प्रमाणात टिकवले त्यांना केवळ पालघर-डहाणू व मोखाडा तालुक्यात जागा जिंकता आल्या. वसईतील निवडणुका लढवण्याच्या फंदात राष्ट्रवादी कधीच पडत नाही. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली आहे, एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या डहाणू तालुक्यामध्ये त्यांना एकुण १२ जागापैकी केवळ दोन जागा जिंकता आल्या. बहुजन विकास आघाडीला पालघर, डहाणू व वसई या समुद्रकिनाऱ्यावरील तीन तालुक्यात चांगली कामगिरी करता आली, परंतु वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार व तलासरी तालुक्यात खाते उघडता आले नाही.
पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडीचे वरीष्ठ नेते सतत प्रयत्नशील असतात. गेल्या काही वर्षात पक्षसंघटना मजबुत करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु त्यांना जिल्ह्णात सत्ताकेंद्र होण्यासाठी प्रयत्नाची परकाष्ठा करावी लागणार आहे. वसई लगत असलेल्या पालघर तालुक्यात ५ जागा जिंकुन आपण पंख पसरत असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. तर डहाणू तालुक्यात २ जागा जिंकुन चंचुप्रवेश केला आहे. जिल्हापरिषदेच्या या १ ल्या
सार्वत्रिक निवडणुकातील निकालानंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीवर कसा तोडगा निघतो याकडे तमाम पालघरवासीयांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे वरीष्ठ नेते व पालकमंत्री विष्णु सावरा यांनी मित्रपक्ष असलेल्या सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यास सेनेकडून किती प्रतिसाद मिळतो यावर सारे काही अवलंबुन आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या भाजपाच्या निर्णयाला सेनेकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपाच्या नेत्यांचे मनोमिलन होईल का? हा खरा प्रश्न आहे.
दुसरीकडे युती झाल्यास बविआला समवेत घेणार का? अशा दोन महत्वाच्या प्रश्नावर त्रिशंकू असलेल्या जिल्हापरिषदेची पुढील वाटचाल ठरणार आहे. खा. अॅड. चिंतामण वनगा व पालकमंत्री विष्णू सवरा या दोघांच्या कोर्टात चेंडू असून तो कुणाच्या दिशेने फटकवतात हे येत्या २ ते ३ दिवसात स्पष्ट होईल.
पालघर विधानसभा जिंकणाऱ्या सेनेला ७ जागांवर समाधान मानावे लागले. विक्रमगड येथे मात्र भाजपाने आपला गड राखला येथे ५ पैकी ४ गट जिंकुन भाजपाने बाजी मारली. सेनेला डहाणू, वसई, तलासरी येथे एकही जागा जिंकता आली नाही. तर बविआलाही वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा व विक्रमगड तालुक्यात खाते उघडता आले नाही. मार्क्स. कम्यु. नी मात्र डहाणू, जव्हार व तलासरी या तीन तालुक्यात ५ जागा जिंकल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरीची लागण झालेल्या कम्युनिष्टांना या निवडणुकीमध्ये मात्र थोडे फार सावरणे शक्य झाले आहे.
जिल्हापरिषदेची सध्याची अवस्था त्रिशंकू असून बविआ, भाजपा, सेना या तीनही पक्षाना यशोमंदिर गाठता आले नाही. या निवडणुकीमध्ये सेना-भाजपाने आपापल्या वेगळ्या चुली मांडल्या होत्या. त्यामुळे सत्तेच्या राजकारणामध्ये ते एकत्र येतील का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.