भाजपाचे नरेंद्र मेहता ३२ हजार मतांनी विजयी
By Admin | Updated: October 20, 2014 03:50 IST2014-10-20T03:50:38+5:302014-10-20T03:50:38+5:30
मीरा-भार्इंदर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता एकूण ९१ हजार ४६८ मते मिळवून ३२ हजार २८८ मतांनी विजयी झाले

भाजपाचे नरेंद्र मेहता ३२ हजार मतांनी विजयी
भार्इंदर : मीरा-भार्इंदर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता एकूण ९१ हजार ४६८ मते मिळवून ३२ हजार २८८ मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोन्सा यांना ५९ हजार १७६ मते मिळाली. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही मोदी-लाट कायम असल्याची कबुली देऊन पराभव स्वीकारल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले.
यंदाची निवडणूक भाजपा व राष्ट्रवादीत काट्याची असल्याची चर्चा असतानाच रविवारच्या मतमोजणीनंतर त्याला पूर्णविराम मिळाला. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टाने आलेली मते मोजण्यात आली. एकूण ११० मतांपैकी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा यांना २४, भाजपाचे नरेंद्र मेहता यांना २८, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे यांना ३० व काँग्रेसचे याकुब कुरेशी यांना ९ मते मिळाली. उर्वरित मतांपैकी १६ मते बाद व ३ मते नकारार्थी देण्यात आली. त्यानंतर, झालेल्या मतदान यंत्रांतील मतमोजणीत मेंडोन्सा यांनी पहिल्या ७ फेऱ्यांत आघाडी घेऊन मेहता यांचे टेन्शन वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुढील सर्व फेऱ्यांत मेहता यांनी आघाडीत मुसंडी मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. निवडणूक प्रचारात आघाडी घेणाऱ्या मेहता यांनी मेंडोन्सा यांना ३२ हजार २८८ मताधिक्क्याने धूळ चारली