Join us  

मुंबईत भांडुप पोटनिवडणुकीत भाजपाच्या जागृती पाटील विजयी, शिवसेनेचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 11:18 AM

आज राज्यातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत भांडुपमधल्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

मुंबई - आज राज्यातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत भांडुपमधल्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. इथून भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.  त्यांनी 5 हजार मतांनी विजय मिळवला. भाजपा उमेदवार जागृती पाटील यांना एकूण 11229 मते मिळाली तर, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाली. 

काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.  भाजपाने ही जागा मिळविण्यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर होती. त्यामुळे दोन पाटलांमध्येच या प्रभागात रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उभय पक्षांचे बडे नेतेच प्रभागात तळ ठोकून होते. 

यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्येच दिसून आली. आपल्या जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती, परंतु मतदारांमध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५०.६४ टक्के मतदान झाले.

टॅग्स :भाजपा