मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:05 IST2021-05-17T04:05:02+5:302021-05-17T04:05:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा असेल व ...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा असेल व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यात संपूर्ण ताकदीने सहभागी होतील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुंबई येथे केली. मराठा आरक्षणासाठी आपल्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशिष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत झाली. यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाला एकटे पडलो आहोत व आपल्यासोबत कोणताही नेता नाही. असे वाटत होते. परंतु, पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटना जे आंदोलन करतील, त्यामध्ये भाजप खांद्याला खांदा लाऊन सहभागी होईल. आंदोलनाची स्वायत्तता भाजपा कायम राखेल. तेथे पक्षाचा झेंडा किंवा नाव असणार नाही, असे पाटील म्हणाले.
वर्षानुवर्षे संघर्ष करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. देवेंद्र फडणवीस सरकारने समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही या कायद्याला स्थगिती आली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील अनेक परिच्छेदात महाविकास आघाडी सरकारच्या चुका व ढिलाई दिसून येते. आघाडीने हा खटला जिद्दीने लढविला नाही. निकालपत्राचा अभ्यास करून सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजप कायदेतज्ञांची समिती नेमणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पुन्हा पुन्हा लॉकडाऊन लावला जात आहे. मराठा समाजाचा संताप उफाळून येऊ नये व समाजाने आंदोलन करू नये, असे सरकारला वाटते. अशा प्रकारे लॉकडाऊन लाऊन मराठा समाजाचा संताप थंड होईल, असे राज्यातील सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असल्याचेही ते म्हणाले.