वसईत पाण्यासाठी भाजपाचा मोर्चा
By Admin | Updated: April 10, 2015 23:52 IST2015-04-10T23:52:53+5:302015-04-10T23:52:53+5:30
शहरातील पाणीटंचाई विरोधात शुक्रवारी नवघर-माणिकपूर शहर भाजपातर्फे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड च्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. त्यात भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

वसईत पाण्यासाठी भाजपाचा मोर्चा
वसई : शहरातील पाणीटंचाई विरोधात शुक्रवारी नवघर-माणिकपूर शहर भाजपातर्फे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड च्या कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. त्यात भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
वसई विरार उपप्रदेशाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे, तसेच वीजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. अनेक भागात १ दिवस आड पाणी येत असल्यामुळे नागरीकांना पाण्यासाठी इतर पर्यायाचा आधार घ्यावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहर भाजपाने मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते केदारनाथ म्हात्रे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली.
यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात महानगरपालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर जोरदार हल्ला चढवला. मात्र, पाणी टंचाई हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असूनही मोर्चाला नागरीकांचा अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)