Join us  

'पराभव दिसल्यानेच पवारांची माढ्यातून माघार, हा भाजपाचा पहिला विजय' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 9:48 PM

पवारांच्या घराणेशाहीबद्दल त्यांनाच माहिती, पण आजही त्यांच्या कन्या आणि नातू राजकारणात येणारच आहेत की ?

मुंबई - बहुतेक पराभव दिसल्यानेच शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असेल. मात्र, पवारांची माघार हा भारतीय जनता पक्षाचा देशातील पहिला विजय असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे. सुभाष देशमुख यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवार यांच्याविरुद्ध माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे पवारांच्या निर्णयानंतर सुभाष देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

पवारांच्या घराणेशाहीबद्दल त्यांनाच माहिती, पण आजही त्यांच्या कन्या आणि नातू राजकारणात येणारच आहेत की ? . मी 1998 पासून राजकारणात आहे. 2004 साली सोलापूर लोकसभा, 2009 ला माढा लोकसभा असेल, 2009 ऑक्टोबर तुळजापूर विधानसभा असेल आणि 2014 साली पश्चिम मतदारसंघातून असेल. त्यामुळे मला जिल्ह्याच्या राजकारणातील निवडणूक लढविण्याचा मोठा अनुभव आहे. मी सहावी निवडणूक कुठेही लढवायला तयार आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी माढाच काय, कुठेही निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असे सहकारमंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत 'आजोबा' शरद पवार यांनी दिले. एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवावी?, असा प्रश्न करत, नातवासाठी आपण माघार घेणार असल्याचंही त्यांनी सूचित केलं. स्वाभाविकच, शरद पवारांची माघार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानंतर, पवारांच्या विरोधकांकडून शरद पवार यांच्या निवडणूक न लढविण्याचे कारणं सांगण्यात येत आहेत. तर, पवार समर्थकांकडून त्या नेत्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची माघार म्हणजे युतीचा मोठा विजय आहे. राजकीय वारं ओळखून पवारांनी माघार घेतल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी युतीचा 'फुसका वारा' म्हणत टीका केली. तसेच माढ्यासह उर्वरित महाराष्ट्र जिंकू, आणि मुख्यमंत्र्यांना वर्षावर येऊन पेढा भरवू, असे धनंजय मुंडें यांनी म्हटले आहे. नाही तरी 23 मे नंतर देशातल्या निकालाने तुमचे तोंड कडू पडणार आहे. त्यावेळी तुम्हाला तोंड गोड करायला पेढा लागणारच असल्याचा टोलाही मुंडेंनी लगावला. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज आनंद व्यक्त करण्यापेक्षा माढ्याच्या निवडणूक रिंगणात उतरावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

टॅग्स :शरद पवारसुभाष देशमुखलोकसभालोकसभा निवडणूक २०१९