वाडा रुग्णालयाला ठोकले भाजप कार्यकर्त्यांनी टाळे
By Admin | Updated: December 25, 2014 00:05 IST2014-12-25T00:05:58+5:302014-12-25T00:05:58+5:30
वाडा तालुक्यासाठी असलेले वाडा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी नसल्याने बेवारस ठरले आहे. वाड्यात आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा राहतात.

वाडा रुग्णालयाला ठोकले भाजप कार्यकर्त्यांनी टाळे
कुडूस : वाडा तालुक्यासाठी असलेले वाडा ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी नसल्याने बेवारस ठरले आहे. वाड्यात आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा राहतात. मात्र, त्यांच्या गावातील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक तक्रारी करूनही येथे वैद्यकीय अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक नाही. अन्य पदेही वर्षभरापासून भरलेली नाहीत. अखेर, मंगळवारी या कारभाराला कंटाळून सवरा यांच्याच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला टाळे ठोकले.
वाडा रुग्णालयात दिवसाला शेकडो आंतर व बाह्यरुग्ण येतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचा जीव रामभरोसे आहे. अन्य समस्यांसोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ४ जागा रिक्त असताना भिवंडी, पालघर, जव्हार, डहाणू येथील रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही दिवसांसाठी रुग्णालयात तात्पुरती नेमणूक दिली जाते.
बुधवारी रमेश बागुल, ताहीर लतीफ अन्सारी, भीमराव बागुल हे रुग्णमित्र संस्थेचे कार्यकर्ते येथे आले असता शेकडो रुग्ण रुग्णालयाबाहेर बसलेले दिसले. याची खबर स्थानिक कार्यकर्ते भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद वाडेकर, वाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते कुणाल साळवी यांना दिली. या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील या कारभाराचा पर्दाफाश केला. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मस्टरवर आठ-आठ दिवसांच्या सह्या नाहीत. काहींनी गैरहजर लिहिलेले खोडून त्या जागी सह्या केल्या आहेत. अन्य सुविधांबाबत येथे बोम्ब आहे़ मस्टर ताब्यात असलेले कर्मचारी कोर यांनी सांगितले की, सह्या घेणे अगर मस्टरवर कर्मचारी आले नाहीत तर गैरहजर लिहिणे माझे काम नाही. असा कारभार सध्या वाडा ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. (वार्ताहर)