भाजपचे शिवसेनेला ऐकावेच लागेल-- शरद पवार

By Admin | Updated: September 15, 2014 23:12 IST2014-09-15T23:01:16+5:302014-09-15T23:12:52+5:30

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला नाही

BJP will have to listen to Shiv Sena - Sharad Pawar | भाजपचे शिवसेनेला ऐकावेच लागेल-- शरद पवार

भाजपचे शिवसेनेला ऐकावेच लागेल-- शरद पवार

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत भाजप जो आकडा सांगेल तो शिवसेनेला ऐकावा लागेल. कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दहा ते अकरा जागा मोदींच्या प्रभावाने निवडून आल्या असल्याने त्याची शिवसेनेच्या नेतृत्वाला जाणीव नसेल असे म्हणता येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन्ही काँग्रेसमधील जागावाटपाबाबत काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी परदेशातून परतल्यानंतर तीन-चार दिवसांत निर्णय होईल. काही झाले तरी दोन्ही काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील हे एकदा ठरले असल्याने जागावाटपाबाबत फार अडचणी येणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यस्तरीय प्रचार प्रारंभ उद्या, मंगळवारी येथील गांधी मैदानातील जाहीर सभेने होत आहे. त्यासाठी येथे आलेल्या पवार यांनी आजच दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जागावाटपावरून महायुतीत तणाव असला तरी ती तुटणार नाही. भाजपने यावेळेला जास्त जागांचा आग्रह धरला आहे, तो शिवसेनेला मान्य करावा लागेल. कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा जो विस्तार दिसतो आहे, तो मोदी यांच्यामुळे आहे याची जाणीव शिवसेनेच्या नेतृत्वाला असेल. त्यामुळे वाढीव जागा भाजपला द्याव्या लागतील.’उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच तर तुमची काय प्रतिक्रिया असेल, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘हा प्रश्न आत्याबार्इंना मिशा असत्या तर....’असा आहे; परंतु काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे यांचे भविष्य सांगितले आहे. त्यामुळे माझ्या म्हणण्यापेक्षा राणे यांचे भाष्य जास्त महत्त्वाचे आहे. कारण एकेकाळी ते त्यांचे सहकारीच होते. त्यामुळे त्यांची ताकद राणे यांनाच ठाऊक आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही आपण थेट सत्तेच्या राजकारणात सहभागी होऊ नये अशी होती. ती पुढच्या पिढीने बदलली असेल तर मला माहीत नाही.’
राज्यात १९९५ ला शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर पुढची पंधरा वर्षे जनतेने या सरकारचा धसका घेतला. लोकसभा निवडणुकीतही मोदी यांची लाट नव्हती व अशा अनेक लाटा मुंबईने आतापर्यंत झेलल्या असल्याचा निष्कर्ष भाजपच्या सहयोगी पक्षाच्या नेत्यांनीच काढला आहे. त्यामुळे आम्ही तसे म्हणणार नाही. लोकसभेला जो निकाल महाराष्ट्रात लागला त्याची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही. यापूर्वी २००४ ला केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यावर महाराष्ट्रात मात्र जनतेने काँग्रेस आघाडीच्याच हाती सत्ता दिली. तसेच यावेळेलाही होईल, असे पवार यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर तृप्ती माळवी, शहराध्यक्ष आर. के. पोवार आदी उपस्थित होते.


गळती नव्हे कारवाईची भीती
‘राष्ट्रवादी’ला सर्वाधिक गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर पवार म्हणाले, ‘वस्तुस्थिती तशी नाही. जेवढे गेले, त्याहून जास्त आमदारांनी आजच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जे लोक सोडून गेले, त्यांनी कारभार सुधारावा अशा सूचना दिल्या होत्या; परंतु तो सुधारला नसल्याने कारवाई होणार ही चाहूल लागल्यावर त्यांनी पक्ष सोडला आहे.’
‘सोशल’ बदनामी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल जी सोशल मीडियावरून बदनामी सुरू आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी’चा जाहीरनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा येत्या चार दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्या परदेशात गेल्या असल्याने दोन्ही काँग्रेसमधील जागा वाटपाची प्रक्रिया खोळंबली आहे. त्या आज येणार होत्या. त्यामुळे तीन-चार दिवसांत जागा वाटप होऊन थेट मतदारसंघ व उमेदवारांची नावेच जाहीर करू.’

राष्ट्रवादीचा कोल्हापुरातून आज प्रचार प्रारंभ
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील जाहीर प्रचाराचा प्रारंभ उद्या, मंगळवारी कोल्हापुरातून होत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह डझनभर मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरातील गांधी मैदान येथे उद्या, दुपारी चार वाजता सभा होणार आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत अधिकृत प्रचाराचा नारळ फोडला असला, तरी जाहीर प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातूनच करण्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार उद्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ होत आहे.

गडकरी, फडणवीस व जावडेकर
राज्यातील सरकारवर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व प्रकाश जावडेकर हे टीका करीत आहेत. त्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही. या नेत्यांची वक्तव्ये ग्रामीण भागातील जनताही फारशा गांभीर्याने घेत नाहीत, असेही पवार यांनी सांगितले. यातून त्यांना वेगळाच अर्थ ध्वनीत करायचा होता.

 

Web Title: BJP will have to listen to Shiv Sena - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.