Join us  

मुंबईत भाजपाचा विजय निश्चित- आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 8:02 PM

दोन्‍ही मतदार संघ आमचेच; आशिष शेलारांचा दावा

मुंबई: पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघ हे दोन्‍ही मतदार संघ पारंपारिक भाजपाचे असून ते पुन्‍हा आपण मिळवू. गेल्‍या पाच वर्षात मुंबईत ज्‍या ज्‍या निवडणुका झाल्‍या त्‍या सर्व भाजपाने जिंकल्‍या. आता शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात विजयाची ही श्रृखंला भाजप कायम राखेल, असा विश्‍वास महसूल मंत्री चंद्रकात पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्‍त केला.

मुंबई पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अॅड. अमित महेता आणि मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार  प्रा. अनिल देशमुख यांच्‍या निवडणूक तयारीसाठी आज वसंत स्‍मृती, दादर येथे भाजपा पदाधिका-यांचा मेळावा मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आला. यावेळी भाजपा आमदार राज पुरोहित, मंगल प्रभात लोढा, सरदार तारासिंग, भाई गिरकर, अॅड. पराग अळवणी, अमित साटम, मनिषा चौधरी, आर.एन. सिंग, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्‍यासह संघटन मंत्री सुनिल कर्जतकर, महामंत्री अमरजित सिंह, विनायक कामत, अभिजित सामंत यांच्‍यासह माजी आमदार, मुंबई पदाधिकारी, सर्व जिल्‍हा अध्‍यक्ष, मंडल अध्‍यक्ष आणि वॉर्ड अध्‍यक्ष व कार्यकर्ते मोठया संख्‍येने उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्‍यांना मार्गदर्शन करताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्‍हणाले की,  संघटनेच्‍या पदाधिका-यांनी मतदारापर्यंत पोहचून त्‍यांच्‍याशी व्‍यक्‍तिगत संपर्क साधणे आवश्‍यक आहे. मुंबईत भाजपाचे बुथ स्तरावरील संघटन आता मजबूत असून या सर्व पदाधिका-यांनी आजपर्यंत सर्वच निवडणुकांमध्‍ये ज्‍या पध्‍दतीने काम केले आहे त्‍याच पध्‍दतीने काम केले तर भाजपाच्‍या उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे. तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशिक्षित मतदारांसाठी अनेक महत्‍वाचे निर्णय घेतले आहेत, ते मतदारांपर्यंत पोहचून त्‍यांना सांगा. भाजपा सरकार केंद्रात आणि राज्‍यात आल्‍यानंतर मुंबईच्‍या विकासाचे अनेक निर्णय झाले. काही कामे पुर्णत्‍वावर आहेत. त्‍याची माहिती मतदारांना द्या. आपल्‍या सरकारची ही कामे मतदारापर्यंत घेऊन गेल्‍यास विजय आपला निश्चित असल्‍याचा विश्‍वास तावडे यांनी व्‍यक्‍त करीत कार्यकर्त्‍यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी निवडणुक प्रक्रियेबाबत माहिती देतानाच दोन्‍ही उमेदवार हे पक्षाचे निष्‍ठावान कार्यकर्ते आहेत. मुंबईकरांच्‍या, शिक्षकांच्‍या प्रश्‍नावर लढणारे दोन्‍ही कार्यकर्ते असून त्‍यांना पक्षाने ही संधी दिली आहे. अॅड अमित महेता यांनी मुंबईतील धार्मिक स्‍थळांवर हातोडा पडत असतना त्‍यांची बाजू न्‍यायालयात मांडली, जुन्‍या चाळीतील रहिवाशांच्‍या हक्‍कासाठी न्‍यायालयीन लढा ते आजही देत आहेत. तर रेरा तही ते संघर्ष करीत असून  गृहनिर्माण सोसायटया, मेट्रो बाधीत रहिवाशांच्‍या हक्‍कासाठी ते लढत आहेत. त्‍यामुळे ख-या अर्थात सुशिक्षित आणि मुंबईकरांसाठी लढणारा कार्यकर्ता या निवडणुकीत उमेदवार पक्षाने दिला आहे. या दोन्‍ही जागा यापुर्वी भाजपाच्‍या होत्‍या. भाजपाचे आमदार या दोन्‍ही जागांवर निवडून येत होते. मधल्‍या काळात भाजपाने या जागांकडे फारसे लक्ष दिले नाही. आता पुन्‍हा या दोन्‍ही जागा भाजपाच जिंकणार, असा विश्‍वास व्‍यक्‍त करीत कार्यकर्त्‍यांना विजयाचा आत्‍मविश्‍वास दिला.

टॅग्स :भाजपाआशीष शेलार