भाजप विरुद्ध काँग्रेस की, ठाकरे गट... गोपाळ शेट्टी यांना यंदा कोण टक्कर देणार?

By दीपक भातुसे | Published: June 15, 2023 08:45 AM2023-06-15T08:45:35+5:302023-06-15T08:46:51+5:30

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ: पाहा कसं आहे समीकरण

BJP vs Congress Or Thackeray group... Who will compete with Gopal Shetty this time? | भाजप विरुद्ध काँग्रेस की, ठाकरे गट... गोपाळ शेट्टी यांना यंदा कोण टक्कर देणार?

भाजप विरुद्ध काँग्रेस की, ठाकरे गट... गोपाळ शेट्टी यांना यंदा कोण टक्कर देणार?

googlenewsNext

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस हाच सामना रंगत आला आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविल्यास हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार की, शिवसेनेच्या याबाबत उत्सुकता आहे. हा मतदारसंघ कोणाच्याही पारड्यात गेला तरी सध्या या मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून, त्याचे कारण खासदार गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघात केलेली कामे आणि सातत्याने ठेवलेला जनसंपर्क आहे.

उत्तर मुंबई हा भाजपचा गड मानला जातो. मात्र, दोन वेळा या गडाला काँग्रेसने सुरुंग लावला होता. या मतदारसंघातून माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक हे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसने अभिनेता गोविंदाला उमेदवारी दिली आणि गोविंदाने राम नाईक यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यानंतर २००९ ला काँग्रेसचे संजय निरुपम निवडून आले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने पुन्हा विजय खेचून आणला. २०१४ ला भाजपचे गोपाळ शेट्टी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. २०१९ ला काँग्रेसने पुन्हा सेलिब्रिटी पॅटर्न आणत उर्मिला मातोंडकर यांना गोपाळ शेट्टींविरोधात उमेदवारी दिली. मात्र, यावेळी हा पॅटर्न चालला नाही आणि गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा इथून खासदार झाले.

२०१९ च्या निवडणुकीतच काँग्रेसला येथे उमेदवार शोधावा लागला होता. त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने येथून उभे केले होते. यावेळीही काँग्रेसची तीच परिस्थिती आहे. एकीकडे काँग्रेसकडे उमेदवार नाही, तर वर्षानुवर्षे युतीत हा मतदारसंघ भाजपकडे राहिल्याने शिवसेनेलाही (ठाकरे गट) येथे उमेदवार उभा करण्यासाठी शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून येथे कुठलाही पक्ष रिंगणात असला तरी सध्याची परिस्थिती पाहता भाजपला हा मतदारसंघ अनुकूलच आहे.

कसे आहे विधानसभेचे बलाबल?

  • विधानसभा मतदारसंघांची परिस्थिती पाहिली तर दहिसर, बोरीवली, चारकोप, कांदिवली पूर्व या मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत, तर मागाठाणे येथे शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. काँग्रेसकडे या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी केवळ मालाड पश्चिम हा एकच विधानसभा मतदारसंघ आहे.
  • काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने अद्याप या मतदारसंघात निवडणुकीची विशेष तयारी केलेली दिसत नाही. उलटपक्षी भाजपकडून या मतदारसंघात नियमितपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  ही भाजपसाठी जमेची बाजू ठरणार आहे.


भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी

विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याव्यतिरिक्त या मतदारसंघातून प्रवीण दरेकर आणि योगेश सागर इच्छुक आहेत. सध्या या मतदारसंघात भाजपअंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरीवलीचे आमदार सुनील राणे यांच्यात हा संघर्ष आहे. यातूनच राणे हे शेट्टींच्या उमेदवारीला विरोध करत आहेत.

विनोद तावडेंचे पुनर्वसन?

विनोद तावडे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बोरीवली मतदारसंघातून निवडून आले. मात्र, २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर दिल्लीतून विशेष जबाबदारी देत राष्ट्रीय सरचिटणीस केले. सध्या दिल्ली आणि महाराष्ट्र अशा दोन्ही पातळ्यांवर पक्षाच्या कामात ते लक्ष देत आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

गोपाळ शेट्टींचा विक्रम

२०१४ च्या निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी पराभव केला होता. मुंबईतील भाजपचा हा सर्वांत मोठा विजय होता. २०१९ च्या निवडणुकीत तर  महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्य गोपाळ शेट्टींना मिळाले होते. त्यांनी तब्बल ४ लाख ५३ हजार मतांनी विजय मिळविला होता.

Web Title: BJP vs Congress Or Thackeray group... Who will compete with Gopal Shetty this time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.