Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३ दशकांनी स्थायी समितीवर भाजपचा ताबा; प्रभाकर शिंदे अध्यक्ष; शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर यांची झाली बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 05:45 IST

शिंदे हे स्थायी समितीवरील ८१वे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी, १३ वर्षे स्थायी समितीवर काम केले होते. शिवसेनेच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणूनही त्यांनी काम केले होते.

मुंबई : महापालिकेच्या सर्वांत महत्त्वाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी तीन दशकांनंतर पहिल्यांदा भाजपचे प्रभाकर शिंदे विराजमान झाले, तर शिक्षण समिती अध्यक्षपदी याच पक्षाच्या राजश्री शिरवडकर यांची निवड झाली. विरोधी पक्षांकडून कोणीही अर्ज न भरल्यामुळे महापौर रितू तावडे यांनी या दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या दोन्ही पदांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली.

शिंदे हे स्थायी समितीवरील ८१वे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी, १३ वर्षे स्थायी समितीवर काम केले होते. शिवसेनेच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणूनही त्यांनी काम केले होते. २०१७च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश करून मुलुंड मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांनी भाजप गटनेते पदावरही काम केले होते. शिक्षण समिती अध्यक्ष शिरवडकर या तीन वेळा नगरसेवकपदावर निवडून आल्या असून, त्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणूनही काम केले आहे.

महापालिकेचे कर संकलनाचे प्रमाण एकूण उद्दिष्टापेक्षा सुमारे ५० टक्के आहे. कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असते, ती वर्षानुवर्ष वाढत जाते आणि याचा परिणाम महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे करनिर्धारणातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या दक्षता विभागाने कर निर्धारणाची काटेकोर छाननी करावी, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केली.

कर निर्धारण व संकलन विकास नियोजन विभाग, परवाने विभाग आणि पाणीपुरवठा विभाग हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे आर्थिक स्त्रोत आहेत. या स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाययोजनांचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला शोष खड्डे बसवण्यात यावे.

प्रत्येक प्रशासन प्रशासकीय विभागात पाणीगळती शोधक यंत्रणा आणि कॅमेरे बसवावेत, असेही त्यांनी सुचित केले. पालिकेच्या औषधाच्या अनुसूचीमध्ये सुप्रसिद्ध व नामांकित कंपन्यांची औषधे समाविष्ट करावीत, अशी सूचना त्यांनी केली. मुंबईतील हरित क्षेत्रे अबाधित राहावी या करिता स्थानिक प्रजातींचे वृक्ष, पाणथळ भागातील जलपर्णी यांचे संरक्षण करण्यासाठी धोरण राबवावे, यावरही त्यांनी भर दिला.

महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रीत करण्यावर भर देण्यात येणार असून, प्रत्येक शाळेत एआय सुविधा, कौशल्य विकास केंद्रांचा विस्तार तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा राजश्री राजेश शिरवडकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांमधील विविध कला - कौशल्यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, मोफत शालेय साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, शाळांमधील अग्निशमन यंत्रणा व फायर सेफ्टी उपकरणे कार्यरत ठेवण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिका शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, ई-वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक उपक्रमांवर भर देत शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यशवंत किल्लेदार आधी सत्ताधाऱ्यांच्या रांगेत, नंतर बसले विरोधी बाकावर

मनसे गटनेते यशवंत किल्लेदार हे स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी ते चुकून सत्ताधारी भाजप सदस्यांच्या रांगेत बसले होते. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते विरोधकांच्या रांगेत जाऊन बसले.

एमआयएमचे गटनेते सदस्य नसतानाही सभागृहात

एमआयएमकडून स्थायी समितीवर जमीर कुरेशी यांचे सदस्य म्हणून नाव दिले आहे. त्यामुळे कुरेशी विरोधकांच्या रांगेत बसले होते. मात्र, निवड प्रक्रिया सुरू असताना एमआयएमचे गटनेते विजय उबाळे हे सभेत आले आणि विरोधी पक्षाच्या रांगेत बसले. मात्र, ते स्थायी समितीचे सदस्य नसल्याचे चिटणीस विभागाने त्यांच्या लक्षात आणून देताच उबाळे सभागृहातून निघून गेले.

८० नगरसेवकांनी आतापर्यंत भूषवले पद स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर

१९३३ ते १९५१ या कालावधीत २१ नगरसेवक अध्यक्ष होते. तसेच, १९५२ ते १९७१ या कालावधीत २१ नगरसेवक, १९७२ ते १९९५ या कालावधीत २१  नगरसेवक अध्यक्ष होते, तर १९९६ ते २०२१ या कालावधीत १७ नगरसेवक असे आतापर्यंत ८० नगरसेवकांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Secures Standing Committee After 3 Decades; New Education Head

Web Summary : After three decades, BJP's Prabhakar Shinde chairs the Standing Committee. Rajashree Shirwadkar heads the Education Committee unopposed. Focus is on revenue enhancement, efficient tax collection, modernizing education, and improving infrastructure.
टॅग्स :मुंबई