Join us

भाजपा-शिवसेनेचा ‘व्हॅलेंटाईन डे’ हुकणार; भाजपाची ताठर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:31 IST

शिवसेनेची एकही मागणी मान्य करायला भाजपाची तयारी नाही, तर दुसरीकडे भाजपासोबत घरोबा करण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने शिवसेनाही ‘लाईन क्लिअर’ करायला तयार नाही.

मुंबई : शिवसेनेची एकही मागणी मान्य करायला भाजपाची तयारी नाही, तर दुसरीकडे भाजपासोबत घरोबा करण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने शिवसेनाही ‘लाईन क्लिअर’ करायला तयार नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीला युतीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ हुकण्याचीच चिन्हे आहेत.निवडणूक तोंडावर आली तरी, युतीचे घोडे चर्चेच्या फडातच अडले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांच्या संपर्कात आहेत, दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे दोन वरिष्ठ मंत्री हे युतीसाठीची चर्चा करीत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने चर्चेत सहभागी होत आहेत. युती करण्यासाठी शिवसेनेने तीन अटी ठेवल्या आहेत. त्यात पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे. दुसरी अट अशी की, शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. (उदा. नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करणे ) आणि तिसरी अट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे. मात्र, यापैकी एकाही अटीला अद्याप भाजपाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.युतीला अंतिम स्वरुप देण्यात आले असून त्यात भाजपाला लोकसभेच्या २५ व शिवसेनेला २३ जागा, तर विधानसभेच्या १४५ जागा भाजपा तर १४३ जागा शिवसेना लढणार असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही बाजूंकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. पालघरची जागा सोडण्याची भाजपाची तयारी नाही. मात्र, मोदी वा शहा यांच्यापैकी एक जण येत्या काही दिवसांत मातोश्रीवर जाऊन युतीसाठी शिवसेनेचा हात मागेल, असे मानले जाते. आम्ही या मुद्यावर युतीचा निर्णय घेतला हे शिवसैनिकांना पटण्यासारखी बाब भाजपाकडून मान्य झाल्याशिवाय शिवसेना युतीला होकार देणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०१९