Join us  

मुंबई महापालिका सभागृहात राडा, भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 8:23 PM

Mumbai Municipal Corporation Meeting : नायर रुग्णालयामध्ये चार महिन्यांच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला.

मुंबई - कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मुंबई महापालिकेची महासभा भायखळा येथील राणीच्या बागेतील सभागृहात घेण्यात येत आहे. मात्र आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणी बागेत राजकीय आखाडा तयार झाला आहे. वरळी बीडीडी चाळीतील आगीच्या दुघर्टनेत जखमींवर नायर रुग्णालयात उपचारासाठी झालेल्या दिरंगाईबाबतच्या चर्चेत शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. यामुळे महासभेचे कामकाज १५ मिनिटांकरता तहकूब करण्याची वेळ महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आली.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे वरळी येथील सिलेंडर स्फोटात जखमींवरील उपचारासाठी नायर रुग्णालयात  झालेल्या दिरंगाईबाबत सभागृहात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी चर्चेत सहभागी होताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काही लोकं याप्रकरणाचा शोध घेण्याऐवजी आरोग्य समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामे देऊन पळ काढत असल्याचा टोला लगावला. यामुळे संतप्त भाजपच्या त्या ११ नगरसेवकांनी अध्यक्ष जाधव त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. 

असे भिडले नगरसेवक...जाधव यांच्या या विधानामुळे भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्या आसनाकडे धाव घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवकही पुढे सरसावले. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. जाधव यांनी आपला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात होती. तर शिवसेनेचे नगरसेवकही आक्रमक झाले होते. त्यामुळे अखेर हा वाद मिटविण्यासाठी काही ज्येष्ठ नगरसेवकांना मध्यस्थी करावी लागली. काही काळानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या प्रकरणात दोषी व्यक्तींना पुन्हा पालिकेच्या सेवेत घेऊ नये, अशी भूमिका मांडली.

शिवसेनेची भूमिका बेताल असून गंभीर विषयावर चर्चा करीत असताना यशवंत जाधव राजकारण करतात. भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयाला दिलेली भेट त्यांना झोंबली. आरोग्य समिती सदस्यांनी दिलेले राजीनामे त्यांना झोंबले असतील. त्या रुग्णालयात भाजपचे कोणी फिरकले नाही, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजपचे नगरसेवक संतापले.- भालचंद्र शिरसाट, (ज्येष्ठ नगरसेवक, भाजप)

या विषयात राजकरण होणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपच्या सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात जो मजकूर लिहिला आहे, त्यातच राजकरण आहे. या घटनेवरुन भाजप राजकरण करत असून आम्ही त्यांचा समाचार घेतला. भाजपने पत्र देऊन राजकरण केल्यामुळे बोलावे लागले.- यशवंत जाधव, (अध्यक्ष  स्थायी समिती)

"कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार?"दुसरीकडे, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भातील ट्विट करत सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार? असा सवाल त्यांनी केला आहे. ते म्हणाले, " नायर रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे ही राजकारण करण्याचे पाप स्थायी समिती अध्यक्षांनी आज पालिका सभागृहात केले. कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार?"

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभाजपाशिवसेना