लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पालिका निवडणुकीनंतर आता सत्तास्थापना आणि विविध समित्यांवरील वर्चस्वाच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवली असली, तरी महापालिकेत गट नोंदणी करताना ते एकत्र येणार असल्याची चिन्हे आहेत. कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात स्वतंत्र नोंदणी न करता ‘एकत्रित गट’ नोंदवण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू झाल्या आहेत.
भाजप आणि शिंदेंसेनेने एकाच गटाची नोंदणी केल्यास स्वीकृत नगरसेवक, वैधानिक व विशेष समित्यांती सदस्यांची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे वैधानिक आणि विशेष समित्यांमध्ये भाजप - शिंदेसेनेची सदस्य संख्या वाढणार असून विरोधकांचे संख्याबळ कमी होणार आहे.
आकडेवारीनुसार, सभागृहात ‘एमआयएम’चा एक स्वीकृत नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप व शिंदेसेनेने स्वतंत्र नोंदणी न करता एकत्रित गट स्थापन केल्यास, एमआयएमचा हा एक सदस्य कमी होऊ शकतो. तर भाजप आणि शिंदेसेनेचे एकूण सहा स्वीकृत नगरसेवक निवडून येऊ शकतात. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र राहिले तर भाजपचे चार आणि शिंदेसेनेचा एक असे पाचच सदस्य निवडून आले असते.
...या समित्यांवर होणार परिणाम
विशेषतः स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती आणि सुधार समिती यामध्ये भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य अधिक वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय विशेष समित्यांमध्येही महायुतीचे दोन सदस्य वाढू शकतात. त्यामुळे आर्थिक निर्णय, विकासकामांचे प्रस्ताव, धोरणात्मक मुद्द्यांवरील मतप्रवाह यावर महायुतीचे नियंत्रण अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या समित्या कोणत्या?
महायुतीने एकत्रित गट नोंदवल्यास स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती, सुधार समिती आदी महत्त्वाच्या समित्यांमध्ये सदस्य वाढणार आहेत. या समित्यांमध्ये भाजप-शिंदेसेनेचा प्रत्येकी एक जादा, तर विशेष समित्यांमध्ये दोन जादा सदस्य वाढू शकतात.
भाजप आणि शिंदेसेनावगळता सर्व पक्षांची कोकण भवनामध्ये नोंदणी झाली आहे. मात्र, महायुतीमधील घटक पक्षांचे संख्याबळ वाढवण्यासाठी आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी भाजप - शिंदेसेना शनिवारी एकत्रितपणे नोंदणी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : BJP and Shinde Sena are likely to register as one group in Mumbai Municipality. This alliance aims to increase their strength in key committees like the Standing Committee, potentially reducing opposition influence and securing more seats.
Web Summary : मुंबई महानगरपालिका में भाजपा और शिंदे सेना एक समूह के रूप में पंजीकरण करा सकते हैं। इस गठबंधन का लक्ष्य स्थायी समिति जैसी महत्वपूर्ण समितियों में अपनी ताकत बढ़ाना, विपक्ष के प्रभाव को कम करना और अधिक सीटें सुरक्षित करना है।