भांडुप येथे भाजप-शिंदेसेनेच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ ; जास्तीच जास्त वॉर्ड मिळवण्यासाठी फिल्डिंग
By मनीषा म्हात्रे | Updated: December 23, 2025 10:54 IST2025-12-23T10:53:19+5:302025-12-23T10:54:51+5:30
- मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तळ कोकणाशी नाते सांगणाऱ्या नोकरदारांचा कायम वरचष्मा राहिलेल्या भांडुप पश्चिम मतदारसंघात ...

भांडुप येथे भाजप-शिंदेसेनेच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ ; जास्तीच जास्त वॉर्ड मिळवण्यासाठी फिल्डिंग
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तळ कोकणाशी नाते सांगणाऱ्या नोकरदारांचा कायम वरचष्मा राहिलेल्या भांडुप पश्चिम मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ आहे. भांडुपमध्ये सात पैकी पाच वॉर्ड भाजपच्या पारड्यात पडावेत, असे इच्छुक उमेदवारांना वाटते, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांनीही जास्तीत जास्त वाॅर्ड आपल्याकडे यावे म्हणून फिल्डिंग लावली आहे.
उद्धवसेना आणि मनसेच्या इच्छुक उमेदवारांचीही या भागात पायपीट वाढलेली दिसत आहे. सायन ते मुलुंड या पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या लाल बहाद्दूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ विखुरला आहे. भांडुपमध्ये सर्वाधिक पाच वॉर्ड सर्वसामान्य प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्याने प्रभाग क्रमांक ११५ मधून उद्धवसेनेचे रमेश कोरगावकर आणि ११६ मधून शिंदेसेनेचे उमेश माने यांचा पत्ता कट झाला. मानेंकडून मुलीसाठी फिल्डिंग सुरू झाली आहे. मात्र, नेहा पाटकर शिंदेसेनेतून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत.
दुसरीकडे प्रभाग ११२ मध्ये भाजपच्या साक्षी दळवी आणि ११६ मध्ये जागृती पाटील या माजी नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक ११०, ११३ आणि ११५ देखील भाजपला मिळावा, अशी मागणी आहे. या प्रभागात काँग्रेसच्या आशा कोपरकर, उद्धवसेनेच्या दीपमाला बढे, तर शिंदेसेनेचे उमेश माने माजी नगरसेवक आहेत.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चुरस
भाजपकडून प्रभाग क्रमांक ११० मध्ये मीरा ठाकूर, चारुशीला समदीसकर, जेनी शर्मा, प्रतिभा लाटकर यांची नावे चर्चेत आहेत, तर ११३ मधून प्रवीण दहितुले तर ११५ मधून निकिता घाडीगावकर, श्रावणी पारकर आणि स्मिता परब इच्छुक आहेत.
शिंदेसेनेकडून यातील काही प्रभाग आपल्या वाटेला यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे अशोक पाटील विजयी झाल्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास वाढला आहे.
११४ प्रभागामधून शिंदेसेनेतून सुप्रिया धुरत, मनसेकडून अनिषा माजगावकर, उद्धवसेनेकडून सुनंदा वाफारे यांची नावे चर्चेत आहेत. मनसेकडून ज्योती अनिल राजभोज, अनिशा माजगावकर, वैष्णवी सरफरे यांच्यासह उद्धवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या नागरिकांच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत.