Join us  

भाजपचा शिवसेनेला १२६ जागांचा प्रस्ताव; इतर मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी भाजपकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 3:30 AM

२८८ पैकी १२६ जागा शिवसेनेला दिल्यास १६२ जागा उरतात. त्यापैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने जागा द्याव्यात

यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील जागावाटपाचा तोडगा अंतिम टप्प्यात असून, भाजप व लहान मित्रपक्ष मिळून १६२ जागा तर शिवसेनेने १२६ जागा लढवाव्यात, असा नवा फॉर्म्युला आता समोर आला असून, तो दोन्ही बाजूंनी मान्य होण्याची शक्यता आहे.

२८८ पैकी १२६ जागा शिवसेनेला दिल्यास १६२ जागा उरतात. त्यापैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने जागा द्याव्यात आणि उर्वरित जागा स्वत: लढाव्यात, असा नवा प्रस्ताव आजच्या चर्चेत भाजपकडून देण्यात आला. कालपर्यंत शिवसेनेला १२० जागा देण्याची तयारी दर्शविणाऱ्या भाजपने आणखी ६ जागा देण्याची तयारी आता दर्शविली आहे. भाजपने मित्रपक्षांना आठ जागा दिल्या, तर त्यांना स्वत:ला लढायला १५४ जागा मिळतील. लहान मित्रपक्षांना आठपेक्षा अधिक काही जागा वाढवून दिल्या, तर त्या प्रमाणात भाजपच्या जागा कमी होतील. लहान मित्रपक्षांचे समाधान करण्याची जबाबदारी आता पूर्णपणे भाजपवर असेल.

लहान मित्रपक्षांनीही आपल्याच कमळ चिन्हावर लढावे, अशी भाजपची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबंधित नेत्यांशी चर्चा करीत आहेत. कमळ चिन्ह घेतले तर निवडून येण्यासाठी तुमच्या उमेदवारांना फायदाच होईल, असे समजविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्या बाबत आधीच नकार दिला आहे.

२०१४ च्या निवडणुकीत भाजप, शिवसेना वेगळे लढले आणि त्यांचे अनुक्रमे १२२ (अधिक एक मित्र पक्ष) आणि ६३ आमदार निवडून आले होते. भाजपने यावेळी युतीमध्ये लहान मित्रपक्षांना ८ जागा दिल्या तर त्यांना १५४ जागा लढायला मिळतील. याचा अर्थ गेल्यावेळी १२२ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ ३२ जादा जागा लढायला मिळतील.भाजपने मित्रपक्षांना आठऐवजी १२ जागा दिल्या तर मग भाजपला १५० जागांवरच समाधान मानावे लागणार आहे.

सर्व मतदारसंघांसाठी शिवसेनेकडून मुलाखतीभाजपपाठोपाठ शिवसेनेनेही सर्व २८८ मतदारसंघांमधील संभाव्य उमदेवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. आजपासून २० सप्टेंबरपर्यंत या मुलाखती मुंबईत चालतील. युतीमध्ये दबावतंत्राचा एक भाग म्हणून सर्वच मतदारसंघांसाठी मुलाखती घेण्याचे तंत्र शिवसेनेने अवलंबिले असल्याचे दिसते.जास्तीच्या ६३ जागा लढायला मिळतीलशिवसेनेला १२६ जागा युतीमध्ये लढायला मिळाल्या, तर ती संख्या त्यांच्या आमदारांच्या (६३) संख्येपेक्षा ६३ जागा अधिक लढायला मिळतील. त्यामुळे विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता, या फॉर्म्युल्यानुसार फायदा हा शिवसेनेचाच होणार आहे.भाजपने लोकसभा निवडणुकीत २५ तर शिवसेनेने २३ जागा युतीमध्ये लढविल्या होत्या. भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :शिवसेनाभाजपा