Join us  

'राज्यातील 288 मतदारसंघात भाजपाचे 10-10 हजार कार्यकर्ते तैय्यार'  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:34 PM

गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने यंदाच्या निवडणुकीतही युती होणार नाही

मुंबई - शिवसेना-भाजपची युतीचं काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून युतीचं घोंगड अद्यपही भिजत ठेवण्यात आल्याचं दिसून येतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कधी युती होणार असं सांगण्यात येतंय. तर कधी स्वबळाची तयारी ठेवण्याचं भाष्य केलं जातंय. मात्र, भाजपाकडून युती होणारचं असे संकेत देण्यात येतात. सोमवारी कराड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होणारच असं म्हटलंय. त्यानंतर, आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावरुन युतीबाबत शंका व्यक्त होत आहे. 

गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने यंदाच्या निवडणुकीतही युती होणार नाही, अशी आस धरून भाजपतर्फे अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केला. गेल्या निवडणुकीत भाजप काही मतांनी पराभूत झाल्याने यंदाच्या निवडणुकीत दावा करून विजय मिळविण्याची धडपड सुरू झाली. मात्र, लोकसभा निवडणुकीत युती झाल्यावर युतीचे वारे विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम दिसत आहेत. त्यातच वरिष्ठ पातळीवरील निर्णयाकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. वरिष्ठ नेत्यांची संमिश्र वक्तव्याने स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र गोंधळ होताना दिसत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत आमचे 288 मतदारसंघात दहा-10 हजार कार्यकर्ते तयार असल्याचं सांगितलंय. बुथ कमिटी, मतदान केंद्रांपासून ते उमदेवारापर्यंत सर्वजण तयार असल्याचे महाजन यांनी म्हटले. त्यामुळे भाजपाकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू असल्याचं दिसून येतंय. पण, महाजन यांनी पुढे बोलताना, आमची युती झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते त्यांना आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हाला मदत करतील, असे म्हणत पुन्हा एका संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, युतीबाबतचा गोंधळ कायम ठेवला आहे. दरम्यान, भाजपा-सेनेमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांना युती होऊच नये, असे वाटत आहे. कारण, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी युती तुटावी, यासाठी देव पाण्यात ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :गिरीश महाजननिवडणूकराजकारणविधानसभाविधानसभा निवडणूक 2019