Join us  

“मुंबै बँक उत्तम आणि प्रगत, हायकोर्टात बदनामीबाबत १ हजार कोटींचा दावा”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 3:42 PM

मुंबै बँकेच्या संचालकपदी असलेले प्रवीण दरेकर यांनी बदनामीबाबत उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती दिली आहे.

ठळक मुद्देमुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँकआमची वैयक्तिक बदनामी करा, राजकीय बदनामी कराबँकेच्या लौकिकास कुठेही गालबोट लागू नये म्हणून हायकोर्टात दावा

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबै बँकेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्य सरकारच्या सहकार विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. चौकशीचा कालावधीही ठरवून देण्यात आला. तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा निर्देश सहकार विभागाने दिले आहेत. यातच आता मुबै बँक राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक असून, त्याच्या बदनामीसाठी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १ हजार कोटींचा दावा करण्यात आला आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. (bjp pravin darekar says we claimed 1 thousand defamation suit over mumbai bank defamation case)

गेल्या काही कालावधीपासून बदनामी, अब्रुनुकसानीप्रकरणी दावा दाखल करण्याचा इशारा अनेक मंत्र्यांनी एकमेकांविरोधात दिला आहे. यातच मुंबै बँकेच्या संचालकपदी असलेले भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँकेच्या बदनामीबाबत उच्च न्यायालयात १ हजार कोटींचा दावा दाखल केल्याची माहिती दिली आहे. सूट नंबर २१९०९ आणि २१९३५ या नोंदणी क्रमांकाप्रमाणे त्या ठिकाणी दावा दाखल झालेला आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

वैयक्तिक बदनामीबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही 

मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बँक आहे. बँकेला इथंपर्यंत आणण्यात माजी अध्यक्ष असतील, संचालक असतील यांचे मोठे योगदान आहे. मुंबईच्या सहकाराचे वैभव आहे. या लौकिकाला काळिमा फासण्याचे काम वेगवेगळ्या टप्प्यावर मुंबई जिल्हा बँकेच्या संदर्भात झाले आहे. वैयक्तिक बदनामीबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही, आमची वैयक्तिक बदनामी करा, राजकीय बदनामी करा, मात्र, ज्या वेळेला एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते, त्यावेळेला त्यांच्या डिपॉझिटरवर परिणाम होतो, ग्राहकांवर परिणाम होतो, त्याच्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे पोट त्याच्यावर असते. उद्या जर एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी थेट विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

दरम्यान, मुंबै बँकेच्या संदर्भात लौकिकास कुठेही गालबोट लागू नये. कारण, १२०० कोटींवरुन १० हजार कोटींच्या टप्प्यावर मेहनतीने बँक आम्ही आणली आणि अशावेळेला कुणीही उठसूट स्टेटमेंट देईल, वाटेल ते छापून आणेल, म्हणून त्यासंदर्भात आम्ही निर्णय केला. १ हजार कोटींची दावा आम्ही याठिकाणी दाखल केलेला आहे. त्यांसंदर्भात असणारी स्टॅम्प ड्युटी, सर्व सोपस्कार आम्ही पूर्ण केलेले आहेत. १ हजार कोटी, सव्वा रुपया वगैरे नाही, १ हजार कोटींचा दावा आम्ही दाखल केलेला आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :प्रवीण दरेकरमुंबईबँकभाजपाउच्च न्यायालय