Join us
Daily Top 2Weekly Top 5

“खाई त्याला खवखवे, नवाब मलिकांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 15:02 IST

नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले.

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. यातच माझ्या घरावर आणि शाळेची रेकी केली जात असल्याचे गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला. यावर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून, नवाब मलिक यांनी आधी काही कृत्य करून ठेवली असतील. त्याची त्यांना जाणीव झाली असेल, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. 

सोशल मीडियाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, अशी टीका नवाब मलिकांनी केली होती. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, हा आखाडा तुम्हीच तयार केला आहे. आता त्यातले पैलवान तुमच्यापेक्षा वरचढ झाले, तर तुम्ही म्हणता सोशल मीडियावर का येता, अशी विचारणा दरेकर यांनी केली आहे. 

नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे

नवाब मलिक यांनीच एक आखाडा तयार करून ठेवला आहे. त्या आखाड्यात ते स्वत:च लोळत आहेत. दुसरा कुणी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायलाही येत नाही. या सर्व गोष्टी, त्यांचे बिनबुडाचे आरोप, त्यांच्या बाष्कळ चर्चा, वक्तव्य, कोर्टानेही त्यांना ट्वीट किंवा आरोप न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण तरी ते थांबायला तयार नाहीत. आपल्याला कोंडीत पकडले जाईल याची भिती असल्यामुळेच ते पाळत ठेवली जात असल्याचे चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. 

खाई त्याला खवखवे

मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे. नवाब मलिक यांनी आधी काही कृत्य करून ठेवली असतील. त्याची त्यांना जाणीव झाली असेल. त्या कृत्यांच्या आधारेच आपलाही अनिल देशमुख होईल की काय, अशी भिती त्यांना वाटतेय. उद्या घडू शकणाऱ्या संभाव्य गोष्टींसाठी आत्तापासूनच मैदान तयार करून ठेवणे, अशी कुटिल नीती नवाब मलिक यांच्या वक्तव्यातून दिसत आहे, अशी शंकाही दरेकर यांनी यावेळी बोलताना उपस्थित केली. 

दरम्यान, काहीजण या गाडीत बसून मागील काही दिवसांपासून माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझे म्हणणे आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावे. मी सगळी माहिती देईन, असे ट्विट करत नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या ट्विटसह नवाब मलिक यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. 

टॅग्स :नवाब मलिकप्रवीण दरेकर