Join us  

“NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणं दूर राहिलं, ठाकरे सरकार त्यांना दोषी ठरवतंय”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 4:02 PM

ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. 

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) एनडीपीएस न्यायालयाने दणका दिला असून, आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई क्रूझ ड्र्ग्ज केस प्रकरणात आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत मोठे गौप्यस्फोट केले होते. तर दुसरीकडे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आर्यनला जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे कौतुक करायचे लांब राहिले, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. 

एकीकडे युवा पिढी अमली पदार्थाच्या व्यसनाकडे जात असताना ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचे असते. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक दूर राहिले. याउलट एनसीबी यंत्रणा आणि त्यांचे अधिकारी कसे दोषी आहेत, अशा संशयाच्या भोवऱ्यात त्यांना उभे करायचे, हे तपास यंत्रणा म्हणून योग्य नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. 

NCB अधिकाऱ्यांचे कौतुक दूर राहिलं, सरकार त्यांना दोषी ठरवतंय

NCB अधिकाऱ्यांचे कौतुक करणे दूर राहिले. राज्य सरकार त्यांना दोषी ठरवत आहे. हेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही सुरू आहे. शिवसेना नेते आर्यन खानच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, हे दुर्दैवी आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी अलीकडेच भाजपबाबत एक गौप्यस्फोट केला होता. भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आपल्याला १०० कोटींची ऑफर दिल्याचा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता. याला उत्तर देताना, शशिकांत शिंदेंना भाजप १०० कोटींची ऑफर देईल, असं मला वाटत नाही. प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, असे मला वाटत, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  

टॅग्स :राजकारणनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोभाजपाप्रवीण दरेकरमहाविकास आघाडी