Join us

भाजपा आमदाराची पालिका अभियंत्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:23 IST

अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आॅडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

मुंबई : भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आॅडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. के-पश्चिम वॉर्डमधील कनिष्ठ अभियंता राठोड आणि सहायक अभियंता पवार यांना साटम यांनी शिवीगाळ करत धमकावल्याचा हा आॅडिओ आहे.अमित साटम हे अंधेरी पश्चिम भागातील आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी साटम यांनी फेरीवाल्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला होता. आता, पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावल्याचा आॅडिओ व्हायरल झाला आहे. साटम यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावत सदर क्लिपच बनावट असल्याचा दावा केला आहे. फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेला संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करून व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून १० महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुने असावे. अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचे आपल्या आठवणीत नाही. अभियंते पवार यांच्याशी आपले चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा साटम यांनी केला आहे. विधानसभेत ५० हजार कोटींचा बिल्डिंग स्कॅम बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरू असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करून दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असेही साटम म्हणाले.

टॅग्स :भाजपा