Join us  

मुंबईला पर्यावरणाच्या ऱ्हासापासून वाचवण्यासाठी मेट्रोचा प्रश्न लवकर मार्गी लावा, भाजपा आमदाराचे पर्यावरणमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 10:03 PM

Mumbai Metro News: कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता मुंबईला येणाऱ्या पर्यावरणाच्या आपतीपासून वाचवण्यासाठी मुंबईचा मेट्रो प्रकल्प त्वरित मार्गी लावा अशी मागणी अमित साटम राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतिशीलतेमुळे मागील २० वर्षांपासून प्रलंबित आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला मेट्रो प्रश्न मार्गी लागत असतांना फक्त आपल्या राजकीय इर्षेपोटी आपण आरे मेट्रो कारशेडला  विरोध केला. त्यामुळे मुंबईकरांचा सोईस्कर असलेला प्रवास खड्यात टाकला असून मुंबईसाठी आवश्यक असलेली मेट्रो रोखली अशी टिका भाजपाचे अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. 

त्यामुळे कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता मुंबईला येणाऱ्या पर्यावरणाच्या आपतीपासून वाचवण्यासाठी मुंबईचा मेट्रो प्रकल्प त्वरित मार्गी लावा अशी मागणी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे तसेच त्यांनी सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ देखिल व्हायरल केला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने गेल्या १० वर्षात सुमारे ३९००० झाडे तोडण्याची परवानगी दिली असून त्यातील २१००० झाडे ही खाजगी बिल्डरच्या प्रकल्पाकरिता तोडण्याची परवानगी दिली अशी माहितीच्या अधिकारात मिळाली आहे अशी आकडेवारी  त्यांनी पत्रात नमूद केली आहे.

एका बाजूला मेट्रोमुळे कितीतरी पट कार्बन फुटप्रिंट वाचणार आहे हे वैज्ञानिक अहवालावरून सिद्ध झाले आहे.आणि हीच बाब सर्वोच्य न्यायालयाने मान्य केली आहे.त्यामुळे आरेच्या मेट्रो कारशेडसाठी २७०० झाडे कापण्याची मान्यता  दिली गेली होती.२७०० झाडे एका वर्षात जेवढा कार्बनडाय ऑक्सासाईड एका वर्षात शोषून घेतात.तितकाच कार्बनडाय ऑक्सासाईड मेट्रो चार दिवसात न्यूट्रलाईझ करते अशी माहिती त्यांनी पत्रातून पर्यावरण मंत्र्यांना दिली आहे. तसेच गेल्या १० वर्षात ३९००० मेट्रोच्या झाडांच्या कत्तलीची परवानगी देणाऱ्या भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो