Join us

गॉड गेमच्या नावाखाली राज कुंद्राकडून ३ हजार कोटींचा घोटाळा; राम कदमांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 13:47 IST

उद्योगपती राज कुंद्रावर भाजप आमदार राम कदम यांचा गंभीर आरोप

मुंबई: पॉर्न फिल्म प्रकरणामुळे अडचणीत आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पाय दिवसागणिक अधिक खोलात जाऊ लागला आहे. मुंबई पोलिसांना राजविरोधात सबळ पुरावे सापडले आहेत. सक्तवसुली संचलनालय (ईडी) लवकरच राजची चौकशी करण्याची शक्यता आहे. आता भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.

राज कुंद्रानं हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. कुंद्रानं गरिबांची फसवणूक केली आहे. गॉड गेमच्या नावावर त्यानं लोकांकडून ३०-३० लाख रुपये घेतले आणि ते त्यांना कधीच परत केले नाहीत, असा आरोप कदम यांनी केला आहे. 'राज कुंद्रानं या गेममध्ये पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाचा आणि फोटोचा वापर केला. देशभरातल्या अनेकांना त्यानं मूर्ख बनवलं आणि पैसे कमावले,' असं कदम म्हणाले.

राज कुंद्रानं अडीच हजार ते तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. लोक जेव्हा त्याच्या कार्यालयात त्याच्याकडे पैसे मागायला गेले, तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे, तर पीडितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली. वियान इंडस्ट्रीच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आला, असा गंभीर आरोप कदम यांनी केला.

भाजप आमदार राम कदम यांनी पोलीस विभागाच्या कार्यशैलीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'जेव्हा लोक राज कुंद्राची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा त्यांनी कारवाई का केली नाही? त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखलं होतं? या सगळ्याचीदेखील चौकशी व्हायला हवी. वियान कंपनीनं अनेकांसोबत करार केले. कंपनी या कराराची मूळ कागदपत्रं स्वत:कडे ठेवायची. या माध्यमातून कंपनीनं अनेकांची फसवणूक केली,' असं कदम म्हणाले.

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीराम कदम