Join us  

अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:42 AM

चौफेर टीकेनंतर अखेर राम कदम यांचा माफीनामा

मुंबई: लग्न करण्यासाठी मुलींना पळवून आणू, असं बेताल विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. माझ्या विधानानं माता-भगिनींची मनं दुखावली. त्याबद्दल मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली आहे. माता-भगिनींचा आदर करत मी पुन्हा त्यांची माफी मागतो, अशा शब्दांमध्ये राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितली. दहिहंडी उत्सवातील वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर राम कदम यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यांच्या या विधानाबद्दल अनेक महिला आणि तरुणींनी संताप व्यक्त केला. राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र दोन दिवस राम कदम यांनी माफी मागितली नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राम कदम म्हणत होते. मात्र संपूर्ण राज्यभरातून संताप होत असल्यानं आज अखेर राम कदम यांनी ट्विट करुन महिलावर्गाची माफी मागितली. 

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली, असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं. 'झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे,' असं राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राम कदम यांच्या विधानाबद्दल भाजपानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. 

 

काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

 

टॅग्स :राम कदमभाजपादही हंडी