Join us  

एमआयएमच्या 'त्या' दोन आमदारांना तात्काळ अटक करा; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 2:37 PM

नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीकडे आढळली एमआयएम आमदारांची लेटरहेड्स

मुंबई: बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून राज्यातील एमआयएमच्या दोन आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड्स जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद अशी दोन आमदारांची नावं आहेत.कायमच बेकायदेशीर आण देशविघातक कृत्यं करणाऱ्या एमआयएमचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी बेकायदेशीरपणे भारताचं नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला गजाआड केलं. त्यांच्याकडून एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद यांची लेटरहेड्स सापडली. त्यामुळे या दोन्ही आमदारांना अटक करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे. 'एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटरहेड्सचा वापर करून मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह देशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी बनावट सरकारी दस्तावेज तयार करण्याचं काम सर्रासपणे सुरू होतं. या टोळीकडे एमआयएमच्या आमदारांची ७ कोरी लेटरहेड्सदेखील मिळाली आहेत. हा प्रकार अतिशय घातक आणि धोकादायक आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांना तातडीनं अटक करा,' असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.

टॅग्स :अतुल भातखळकरऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनभाजपा