भाजपाचे सदस्य नोंदणी महाअभियान
By Admin | Updated: December 30, 2014 00:44 IST2014-12-30T00:44:06+5:302014-12-30T00:44:06+5:30
देशात मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करुन भाजपाला जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे.

भाजपाचे सदस्य नोंदणी महाअभियान
अलिबाग : देशात मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करुन भाजपाला जगातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. राज्यात सव्वा कोटीचे उद्दीष्ठ गाठायचे असल्याने रायगड जिल्ह्याचे योगदान सर्वाधिक असले पाहीजे. त्या अनुषंगाने कामाला लागा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले.
अलिबागमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या सदस्य नोंदणी महाअभियानात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. तालुक्यातील सांबरकुड धरण, जिल्ह्यातील खारबंदीस्थी, रेवस-करंजा पूल व कोळी समाजाच्या मासळी सुकविण्याच्या जागेबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
राज्याच्या विकासाचा रोड मॅप सरकार तयार करीत आहे. हे सरकार मुठभर धनदांडग्यांचे नसून सर्वसामान्यांचेच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच विकास करण्यात येणार आहे. अलिबाग आणि मुरुड शहराला पर्यटनाचा दर्जा देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, तसेच आवश्यक सोयीसुविधांसाठीही योजना निर्माण करण्यात येतील,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, हेमंत दांडेकर, प्रकाश काठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)