Join us  

२०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसणार, भाजपा खासदाराचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:59 PM

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महायुती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याची मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई - भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महायुती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याची मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करत भाजपाला राज्यातील सत्तेमधून बाहेर ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. तर भाजपानेही शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपा २२ नोव्हेंबर रोजी होणारी मुंबई महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही. मात्र २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर बसेल, असा विश्वास भाजपा खासदार मनोज कोटक य़ांनी व्यक्त केला आहे.

 मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्याने शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली आहे. त्याानंतर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये युती तुटण्याचे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची  निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. याबाबत माहिती देताना भाजपा नेते आणि खासदार मनोज कोटक यांनी सांगितले की, ‘’महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला. 

भाजपा सध्या मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावत आहे. मात्र थेट मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत सहभागी होणे भाजपाने टाळले आहे.  २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्य़ा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपानेही जोरदार मुसंडी मारली होती.

टॅग्स :भाजपामुंबई महानगरपालिकाशिवसेनामुंबई