Join us  

'उधारी हवी असेल, तर अर्ज घेऊन ऑफिसला या'; निलेश राणेंनी वैभव नाईकांना पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 3:13 PM

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील आता ट्विटद्वारे वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याची सवंग घोषणाबाजी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांची आज कुडाळात पळता भुई झाली. पेट्रोल वाटपासाठी कुडाळ शहरातील पेट्रोलपंपाची जाहीरात करणाऱ्या शिवसेनेने काढते पाऊल घेत जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न केला. याचा जाब विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मोर्चा वळवला.

पोलीस प्रशासनाला धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर वातावरण जोरदार तापले. यानंतर आमदार वैभव नाईक यांनी ताबडतोब काढता पाय घेतला. आजही वैभव नाईक यांना आंदोलन करण्यासाठीदेखील नारायणराव राणें यांचाच पेट्रोलपंप दिसतो, हा शिवसेनेच्या ५५ वर्षाच्या कारकिर्दीचा आणि वैभव नाईक यांच्या कामाचा दारुण पराभव आहे, असे मत भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील आता ट्विटद्वारे वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. उधारी मागायला आलेल्या शिवसेना आमदार वैभव नाईक याला आमच्या सहकाऱ्यांनी पळवून लावले. पोलिसांच्या गर्दीमध्ये डुकरं स्वतःला वाघ समजू लागले. एक दिवस पोलिसांना बाजूला करा मग बघू या... आणि उधारी हवी असेल तर अर्ज घेऊन ऑफिसला ये, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना भर रस्त्यावर वर्दी पकडत धक्काबुक्की करण्याऱ्या आपल्या पक्षाच्या आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी दिले. शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजीने वातावरण काही काळ तंग झाले होते.

टॅग्स :निलेश राणे वैभव नाईक शिवसेनाभाजपा