Join us  

'ओss मोठ्या ताई...'तुतारी'तुनी थकाल वाजवुनी'; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 1:08 PM

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने काल (२२ फेब्रुवारी) हे चिन्ह पक्षाला बहाल केले. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. हि तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'महाराष्ट्रद्रोही' प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन  महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

सुप्रिया सुळेंच्या या विधानावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कविता म्हणत निशाणा साधला आहे. 

ओ मोठ्ठ्या ताई...

तुतारीतुनी थकाल वाजवुनीभाजपद्वेषाची जुनी पिपाणी…करा कितीही खोटे पेरणीपरि जनतेच्या ना पडेल पचनी..उंटावरली उगा अनेक शहाणीपोकळ बडविती नगारखानी.. लवकरच तुम्हा पाजू पाणी सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष' हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे.

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेसचित्रा वाघ