Join us  

महापालिकेतील समित्यांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हटलं जावं; भाजपचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:49 AM

शिक्षण समितीमध्ये आज चर्चा; प्रशासनाने अंग काढले

मुंबई : महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे करण्याचा ठराव बराच गाजला होता. त्यानंतर आता सर्व वैधानिक, विशेष व प्रभाग समित्यांमध्येही सभेच्या सुरुवातीस राष्ट्रीय गीत गाण्यात यावे, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. अशा सक्तीला समाजवादी पक्षाचा यापूर्वीही विरोध होता. त्यामुळे या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.पालिका शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करण्याची ठरावाची सूचना २०१७ मध्ये महासभेत मंजूर करण्यात आली होती. समाजवादी पक्षाने यावर आक्षेप घेऊन असा ठराव नामंजूर करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. पालिका शाळांमध्ये हे गीत शाळा सुटताना दररोज गायले जाते. हे गीत आता पालिकेतील समित्यांच्या बैठकांमध्येही गायले जावे, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चेसाठी येणार आहे.भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी विविध समित्यांच्या बैठकांना सुरुवात करताना हे गीत गाण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत पालिका महासभेत निर्णय घेण्यात यावा, असा अभिप्राय देताना प्रशासनाने या संभाव्य वादातून आपले अंग काढून घेतले आहे. सध्या हे गीत पालिका सभागृहात महासभेची बैठक सुरू करण्यापूर्वी गायले जाते. वंदे मातरम् म्हणण्यास समाजवादी व एमआयएमच्या नगरसेवकांचा विरोध आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभाजपा