भाजपाने अशी कापली देवरामांची उमेदवारी
By Admin | Updated: September 29, 2014 01:50 IST2014-09-29T01:50:09+5:302014-09-29T01:50:09+5:30
एकीकडे उपनेते अनंत तरे यांचेच तिकीट कापल्यानंतर शिवसेनेच्या वर्तुळात ज्या घडामोडी झाल्या, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली

भाजपाने अशी कापली देवरामांची उमेदवारी
जितेंद्र कालेकर, ठाणे
एकीकडे उपनेते अनंत तरे यांचेच तिकीट कापल्यानंतर शिवसेनेच्या वर्तुळात ज्या घडामोडी झाल्या, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली. पण अशीच परिस्थिती तिकडे राष्ट्रवादीतही होती. राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यामुळे बंडखोरीच्या तयारीतील माजी नगरसेवक देवराम भोईरांना भाजपने तिकीट देऊ केले होते. परंतु, पुन्हा ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करीत माजी आमदार संजय केळकर यांच्यासाठी हे तिकीट पुन्हा खेचून आणले. त्यामुळे भाजपातूनच कॉग्रेसमार्गे राष्ट्रवादीत आलेल्या भोईरांनी पुन्हा एक पाऊल मागे घेतले.
तरे यांच्या घडामोडी पाठोपाठ देवराम भोईरांनाही भाजपने तिकीट दिल्याचीच चर्चा शनिवारी शहरात होती. शेवटी दुपारी १ वा. भाजपाचे जेष्ठ नेते केळकर यांनी एबी फॉर्मसहित उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या चर्चेवर पडदा पडला. अर्ज भरण्याच्या अगदी दोन दिवस आधी युती तुटल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी वगळता ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करण्यासाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागली. एकीकडे चांगल्या, सक्षम उमेदवारांची वानवा असतांनाच ज्या उमेदवाराला तिकीट मिळाले, त्याचे तिकीट काढून दुसऱ्याला देण्याच्या प्रकारांमुळे भाजपातही सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. असाच प्रकार केळकर यांच्या बाबतीत होता होता वाचला.
देवराम यांनी भाजपाचे राष्ट्रीय नेते ओमप्रकाश माथूर यांच्यामार्फत तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत तिकीट कन्फम झाल्याचा निरोपही शुक्रवारी मिळाला होता. ही चर्चा शहरात पसरताच केळकरांच्या समर्थकांनी रातोरात प्रदेश कार्यालय गाठले आणि केळकरांनाच तिकीट मिळण्यासाठी गळ घातली. हे कार्यकर्ते ठाण्यात परतले ते केळकरांची उमेदवारी घेऊनच.