Join us  

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील लेकीसह 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंची घेतली भेट, 'हे' आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 5:49 PM

Harshvardhan Patil, Ankita Patil And Raj Thackeray : हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई - भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या "शिवतीर्थ" या नव्या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील आपल्या लेकीसह गेले होते. पाटील यांची कन्या अंकिता हिचे लवकरच लग्न होणार आहे. याच लग्नसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील शिवतीर्थावर आले होते. लग्नाची पत्रिका हर्षवर्धन पाटलांनी राज ठाकरे यांना दिली आहे. 

अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी आपल्या फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली असं म्हटलं आहे. अंकिता पाटील यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला आहे. पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

"इंदापूर तालुक्याची सुत्रे चुकीच्या माणसाच्या हातात गेली"

"इंदापूर तालुक्याचा १९५२ पासून ते २०१४ पर्यंतचा इतिहास काढून पाहिला तर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता इंदापूर तालुक्यामध्ये होती. मात्र दुदैर्वाने चुकीच्या माणसाच्या हातामध्ये इंदापूर तालुक्याची सूत्र गेल्यामुळे आज आपली अवस्था अशी झाली आहे" अशा शब्दांत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्लाबोल केला होता. "तुम्ही तर राज्यमंत्री आहात आम्ही कॅबिनेट मंत्री होतो. तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा कारभार आम्ही कधी केला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून तालुक्यातील जनतेला वेठीस धरणार असाल तर हे योग्य घडत नाही. तुम्ही जर पहिल्याच दिवशी म्हणाला असता माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडायची नाही. जर वीज तोडली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती" असं म्हटलं होतं. 

"वन टाइम सेटलमेंट करा, ५० टक्के माफी द्या"

"महावितरणने शेतकऱ्यांची वीज जोडावी. महिनाभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची वीज बिले दुरुस्त करून द्यावीत. आम्हालाही कळते पैसे भरावे लागतील. मात्र पैसे कुठले भरायचे? त्याची माफी आम्हाला किती मिळणार, त्यातील दंड व्याज तुम्ही किती कमी करणार, हे प्रत्येक शेतकऱ्याला समजलेच पाहिजे. मग आम्ही तुम्हाला हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. सर्व वीज बिले कमी करा. वन टाइम सेटलमेंट करा. ५० टक्के माफी द्या, मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला कारखान्यांमधून सुद्धा सहकार्य करू. यातून मार्ग काढायला आम्ही सुद्धा तयार आहोत. मात्र हुकूमशाही पद्धतीने तुम्ही विज तोडणार असाल हे खपवून घेतली जाणार नाही" असं ही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :हर्षवर्धन पाटीलराज ठाकरेमनसे