Join us  

...तेव्हा भाजपा सरकारला पडला होता सावरकरांचा विसर, आता फडणवीसांनी केली सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:37 AM

Swatantryaveer Savarkar : भाजपाला आपल्या सत्ताकाळात मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेना आणि भाजपा आमनेसामने भाजपाला आपल्या सत्ताकाळात मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला होता, अशी धक्कादायक माहिती समोर भाजपा सत्तेवर असताना सरकारने प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानच देण्यात आले नव्हते

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आले आहेत. एकीकडे सावरकरांचे नाव घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तर शिवसेनेकडूनही भाजपाला रोखठोक उत्तर दिले जात आहे. दरम्यान, भाजपाला आपल्या सत्ताकाळात मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 राज्यात भाजपा सत्तेवर असताना सरकारने प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानच देण्यात आले नव्हते, ही बाब उघड झाली आहे. दरम्यान, आमच्याकडून अनावधानाने सावरकरांचा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश करायचा राहून गेला, आता या सरकारने ती चूक तातडीने दुरुस्त करावी, अशी सारवासारव माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून राष्ट्रपुरुषांची यादी प्रसिद्ध करण्यात येत असते. या महापुरुषांची छायाचित्रे सरकारी कार्यालयात लावणे अनिवार्य असते. हे खाते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येते. मात्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश राष्ट्रपुरुषांच्या यादीत केलाच गेला नव्हता. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत करण्याच्या पडलेल्या विसराबाबत सारवासारव केली आहे.  

संबंधित बातम्या 

सावरकर गौरवाच्या ठरावावरून गदारोळ

सावरकरांना भारतरत्न मिळावे म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया, विधानसभेत अजित पवार यांचे आवाहन

Veer Savarkar: वीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव फेटाळला; शिवसेनेनं भाजपाचा डाव उलटवला!

दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनी भाजपाने सावरकांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या आक्रमक भूमिकेला प्रत्युत्तर देताना सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही, असे सांगत सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले होते. 

टॅग्स :राजकारणभाजपादेवेंद्र फडणवीसशिवसेना