Join us  

गाळ काढणाऱ्यांच्या माथी वृक्षछाटणी, माजी नगरसेवकाने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 9:59 AM

कोणतेही झाड कापण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रकच राज्य सरकारने काढले आहे.

मुंबई : कोणतेही झाड कापण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे परिपत्रकच राज्य सरकारने काढले आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून वृक्षतोड आणि छाटणी करणाऱ्या संस्था व कंत्राटदार हे तज्ज्ञ नसल्याचा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. 

स्थानिक परिसराचे ज्ञान नसल्याने आणि चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या छाटणीमुळे शहरातील मौल्यवान वृक्षसंपदा कमी होत आहे. बेसुमार छाटणी करून मुंबईच्या हरित क्षेत्राला बाधा पोहोचविणाऱ्या या संस्थांची पार्श्वभूमी म्हणजे हे कंत्राटदार गाळ काढणारे आणि वाहतूक करणारे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे मुंबईत अवैध व अशास्त्रीय पद्धतीने होत असलेल्या वृक्ष छाटणीवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पालिकेने १८ एप्रिलपर्यंत गृहनिर्माण संस्था, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा आदींममध्ये असणारे वृक्ष छाटले नाहीत, म्हणून संबंधितांना ३ हजार ६९० नोटिसा दिल्या आहेत. वृक्ष संगोपनतज्ज्ञांच्या आणि तज्ज्ञ संस्थांच्या अनुपस्थितीत, त्यांच्या सल्ल्याशिवाय पाठविलेल्या या नोटिसांना काय अर्थ आहे, असा प्रश्न नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे. पालिका केवळ दृश्य परिस्थिती पाहून झाडांची छाटणी करते, मग नागरिकांनी ती शास्त्रोक्त पद्धतीने करावी, अशी अपेक्षा का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी झाडांच्या शास्त्रीय पद्धतीने छाटणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि वृक्षसंगोपनतज्ज्ञ, तसेच इतर तज्ज्ञांचे पॅनल पालिकेने तयार करावे, अशी मागणी केली आहे. 

कुलाब्यात शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष सर्वेक्षण-

१) मागील वर्षी ‘ॲमेनिटी ट्री केअर’ या संस्थेचे वृक्षसंगोपनतज्ज्ञ वैभव राजे यांच्याशी नार्वेकर यांनी संपर्क साधून कुलाब्यातील झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण केले होते. 

२) झाडांची पडझड होणे आणि त्यामुळे जीवघेण्या घटना टाळण्यासाठी पालिकेनेही अशाच प्रकारचे सर्वेक्षण शहरभरात वृक्षसंगोपनतज्ज्ञांकडून केले पाहिजे. 

३) या सर्वेक्षणांमुळे झाडांचे आरोग्य तपासण्यात मदत होईल आणि वृक्षतोड आणि छाटणी टाळता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभाजपा