Join us  

“२०२४ मध्ये केंद्रात मोदी सरकारच येईल, विरोधकांमध्ये अंतर्गत सामना सुरुय”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 4:55 PM

ममता बॅनर्जींचा काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न असून, शरद पवारांची त्यांना साथ आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, यानंतर आता महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या अंतर्गत सामना सुरू असून, कितीही प्रयत्न झाले, तरी २०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळीही सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. मात्र, लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही २०२४ मध्ये असेच होणार असून, पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून, विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल, हे पाहू असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

ममता बॅनर्जी यांना शरद पवार यांची साथ

काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे. भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचे असे म्हणत असताना शरद पवार अंडर लाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या असे म्हणायचे असते. तुम्ही एक लक्षात घ्या, ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत. तर पवार साहेब बिटवीन द लाईन बोलणाऱ्या आहेत. दोघांचे बोलणे एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचे आहे. इतरांना सोबत घ्यायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

आम्हीच खरी काँग्रेस आहोत हे त्यांच्या पक्षाचे स्टेटमेंटच 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ममता बॅनर्जी गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये का बरे लढत आहेत? एवढ्याचसाठी की त्यांना आतापर्यंत प्रिन्सिपल अपोझिशन काँग्रेस नाही आम्हीच आहोत हे सांगायचे आहे. काँग्रसे संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत हे त्यांच्या पक्षाचे स्टेटमेंटच आहे. त्या सर्व मताला शरद पवारांचे समर्थन आहे. शरद पवारांचे मत हे पहिल्या दिवसापासून आहे. फक्त राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नाही. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच ते काँग्रेससोबत आहेत, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसममता बॅनर्जीशरद पवारकाँग्रेस