Join us  

'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 8:33 PM

पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राणीबागेतील पेंग्विनला इंग्रजी नाव दिल्यावरुन सुरु असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांना हत्ती व माकडाची उपमा दिल्यानंतर भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी महापौरांना हत्तीणीची उपमा देत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

राणीबागेत मंगळवारी पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात छोट्या पेंग्विनचे नाव ऑस्कर ठेवण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी या इंग्रजी नावावर टीका केल्याने भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हत्तीची तर चित्रा वाघ यांना माकडाची उपमा दिली होती. त्यास प्रत्युत्तर देताना, राणीच्या बागेत नांदते, हत्तीसारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि आख्खी फाईलच गिळते, ओळख पाहू कोण? असे ट्विट भाजपच्या सायन येथील नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केले आहे. राणीबागेत महापौरांचे निवासस्थान असल्याने ही ट्विट त्यांना उद्देशून करण्यात आली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात शुक्रवारी रंगली होती. मात्र राजश्री शिरवाडकर यांच्या बद्दल बोलण्या एवढ्या त्या मोठ्या नाहीत, असा टोला महापौरांनी लगावला आहे.

 

टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा