भाजपा नगरसेविकेला अटक
By Admin | Updated: February 22, 2015 02:12 IST2015-02-22T02:12:02+5:302015-02-22T02:12:02+5:30
गॅरेजमालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चेंबूरमधील भाजपाच्या नगरसेविका राजश्री पालांडे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी अटक केली.

भाजपा नगरसेविकेला अटक
मुंबई : गॅरेजमालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी चेंबूरमधील भाजपाच्या नगरसेविका राजश्री पालांडे (४०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी अटक केली. शुक्रवारी पालांडे यांच्या सांगण्यावरून गॅरेजमालकाकडून लाच उकळण्यास गेलेल्या सुनील खन्ना याला एसीबीने अटक केली होती.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पालांडे व खन्ना या दोघांच्या निवासस्थानी धाडी घातल्या. यात पालांडेंच्या घरी दोन लाखांची रोकड सापडली, तर खन्ना याच्याकडे राहत्या घराव्यतिरिक्त एक सदनिका व दोन गाळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या शालिमार पेट्रोलपंपाजवळ तक्रारदाराचे गॅरेज आहे. हे गॅरेज काही दिवसांपूर्वी पालिकेने पाडले व मालकाला एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावली. ही नोटीस रद्द करण्यासाठी पालांडे व खन्ना यांनी गॅरेजच्या जागेमधून एक गाळा व पाच लाख द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने मालकाने एसीबीकडे तक्रार दिली. तडजोडीअंती दोघांनी एक लाखांवर समझोता केला. त्यातला ५० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना खन्ना गजाआड झाला. त्याच्या चौकशीतून पालांडेंचे नाव पुढे आले. (प्रतिनिधी)
पक्षातून निलंबन
कारवाईनंतर नगरसेविका पालांडे यांचे पक्षातून निलंबन केले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही कारवाई केल्याचे उपाध्यक्ष सुमंत घैसास यांनी पत्रकाद्वारे कळवले. पालांडेंवरील आरोप सिद्ध होणे बाकी असले तरी कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी न घालण्याची पक्षाची भूमिका आहे, असेही या पत्रकात नमूद केले आहे.