भाजप-काँग्रेसमध्ये चिकोडीत चुरशीची लढत
By Admin | Updated: August 6, 2014 00:46 IST2014-08-06T00:38:22+5:302014-08-06T00:46:50+5:30
पोटनिवडणूक : पावसाळ्यात राजकीय वातावरण तापले

भाजप-काँग्रेसमध्ये चिकोडीत चुरशीची लढत
राजेंद्र हजारे - निपाणी .. मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यामुळे चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली. त्या जागेवर २१ आॅगस्टला पोटनिवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसतर्फे खासदार प्रकाश हुक्केरी यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी आणि भाजपतर्फे विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या उमेदवारीची निश्चिती झाली. दोन्ही पक्षांतर्फे जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, येत्या दोन दिवसांत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, भाजपने नेहमीप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. या मतदारसंघातून भाजपने विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला आहे.
चिकोडी-सदलगा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर २०१३ च्या निवडणुकीत भाजपने बी. आर. रांगापगोळ यांना उमेदवारी दिली; पण प्रकाश हुक्केरी यांनी निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. कॉँग्रेसने त्यांच्या विक्रमी मताधिक्याची दखल घेऊन त्यांना तीन खात्याचे मंत्रिपद बहाल केले. जिल्हा केंद्र बॅँकेच्या संचालक निवडणुकीपासून हुक्केरी व कवटगीमठ यांच्यात सत्तेसाठी संघर्ष आहे. या निवडणुकीत कॉँग्रेस आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा, तर भाजप गमावलेली जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. नेतृत्व म्हणून महांतेश कवटगीमठ, तर विकासरत्न म्हणून प्रकाश हुक्केरींचा दबदबा आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)