Join us  

“नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरु नये”; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 7:59 PM

हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरून झालेल्या राजकीय रणधुमाळीनंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होता. राणा दाम्पत्याची जामीनावर सुटका झाली आहे. नवनीत राणा लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. नवनीत राणा यांना भेटण्यासाठी भाजप नेत्यांनी रांग लावल्याचे दिसत आहे. किरीट सोमय्या यांच्यानंतर चित्रा वाघ यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन राणा दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर खरमरीत आणि परखड शब्दांत टीका केली. 

चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून राणा दाम्पत्याला भेटल्याची माहिती दिली. यावेळी चित्रा वाघ यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. याच ट्विटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली. एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल. नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकारने, या शब्दांत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला. 

राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला

चित्रा वाघ यांच्याआधी किरीट सोमय्या यांनी नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. किरीट सोमय्यांनी दोघांचीही यावेळी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला. तसेच मला त्यांचा अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळाची आठवण झाली, असे किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सरकार विरोधात कट केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात १२४ अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता त्याबाबत कोर्टाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असून, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. राणा दाम्पत्याविरोधात दाखल करण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम १२४ अ हे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते, असे कोर्टाने म्हटले आहे. सत्र न्यायालयाचा हा निकाल राज्यातील ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :चित्रा वाघनवनीत कौर राणारवि राणामहाविकास आघाडी