साठेबाजीमागे भाजपावालेच!
By Admin | Updated: October 24, 2015 03:51 IST2015-10-24T03:51:38+5:302015-10-24T03:51:38+5:30
डाळी आणि खाद्यतेलाची साठेबारी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यामुळे डाळींचे भाव उतरल्याचा दावा राज्य सरकार करीत आहे. हा दावा धादांत

साठेबाजीमागे भाजपावालेच!
मुंबई : डाळी आणि खाद्यतेलाची साठेबारी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यामुळे डाळींचे भाव उतरल्याचा दावा राज्य सरकार करीत आहे. हा दावा धादांत खोटा असून, अद्याप एकाही साठेबाजाचे नाव जाहीर करण्यात आले नाही किंवा एखाद्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे दिसले नाही. सरकारने टाकलेले छापे म्हणजे एक फार्स असून, साठेबाजी करणारे भाजपाचे सहानुभूतीदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
कमी पाऊस आणि उत्पादनामुळे डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता चार महिन्यांपूर्वीच सरकारी पातळीवर वर्तविण्यात आली होती. देशात २ कोटी २० लाख टन
डाळींची गरज असताना प्रत्यक्षात १ कोटी ८५ लाख टन डाळींचाच साठा उपलब्ध आहे.
एकूण ३५ लाख टन डाळींचा तुटवडा निर्माण झाला असताना तत्परतेने आयात धोरण शिथिल करण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात मात्र भाजपाच्या सहानुभूतीदार व्यापाऱ्यांना फायदा पोहोचविण्यासाठी मुद्दाम आयातीच्या निर्णयाबाबत विलंब करण्यात आल्याचा आरोप निरुपम यांनी केला. सरकारी धाडीत हजारो टन डाळींचा साठा जप्त केल्याचा सरकारी दावा फसवा असून, त्याचा सामान्य जनतेला कोणताच फायदा पोहोचला नाही.
जप्त केलेल्या डाळी बाजारात आणण्याबाबतची कोणतीच हालचाल सरकारी स्तरावर दिसत नाही. आजही किरकोळ बाजारात डाळींचे भाव २०० रुपयांवरच आहेत. जोपर्यंत अतिरिक्त डाळी बाजारात येत नाहीत तोपर्यंत सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले.
पुन्हा एकदा थाळी-लाटणे आंदोलन
डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने पुन्हा एकदा थाळी-लाटणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. येत्या २६ आणि २७ तारखेस मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशन, बाझार, वॉर्ड आॅफिसबाहेर काँग्रेसतर्फे थाळी-लाटणे आंदोलन करण्यात येईल, असे निरुपम यांनी सांगितले.