Join us  

Maharashtra Politics: “पत्राचाळीतील ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचे काय?”; भाजपचा शरद पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 7:15 PM

Maharashtra News: केंद्रीय कृषिमंत्री असताना एका चाळीच्या पुनर्वसनसाठी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे काय प्रयोजन होते? अशी विचारणा भाजपने शरद पवारांना केली आहे.

Maharashtra Politics: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, यानंतर आता भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यानंतर शरद पवारांनी यावर उत्तर देताना लगेचच याची चौकशी सुरू करण्याचे आव्हान शरद पवारांनी दिले. मात्र, पत्राचाळीतील ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचे काय, अशी विचारणा भाजपने केली आहे. 

पत्राचाळ प्रकरणात माझ्यावर आरोप केले गेले आहेत. मी चौकशीला तयार आहे. माझी लगेच चौकशी करा. पुढच्या ८-१० दिवसांत माझी चौकशी केली तरी चालेल, असे म्हणत शरद पवार यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले. यानंतर भाजपने आक्रमक होत एकामागून एक ट्विट करत शरद पवार यांना पत्राचाळ प्रकरणासंदर्भात काही प्रश्न विचारले. पत्राचाळ प्रकरणाचे शरद पवार हेच रिंग मास्टर आहेत. शरद पवार यांच्या भूमिकेची आणि सहभागाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पत्राचाळीतील ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचे काय?

शरद पवारसाहेब, तुम्हीच सांगा पत्राचाळीतील ७०० च्या वर बेघर झालेल्या मराठी कुटुंबियांना की, केंद्रीय कृषिमंत्रीपदी असताना, एका चाळीच्या पुनर्वसनसाठी 'म्हाडा' च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे काय प्रयोजन होते? देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प होत होता तर एवढी ससेहोलपट मराठी माणसाची का झाली? बेघर झालेले मराठी कुटुंबियांची वेदना जाणून का घेतल्या नाहीत? असे तीन प्रश्न भाजपने शरद पवारांना उद्देशून केले आहेत. याशिवाय, अशा निष्फळ बैठका घेऊन काय फायदा? ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचे काय?, अशी विचारणा पवारांची बाजू नेटाने मांडणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना भाजपने केली आहे.

अतुल भातखळकर यांनी दिलेल्या पत्रात नेमके काय?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळं या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहे. मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, असे अतुल भातखळकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

 

टॅग्स :शरद पवारभाजपा